Parbhani News : मराठवाड्यातली 'हायव्होल्टेज' लढतींपैकी एक असलेल्या लोकसभेच्या परभणी मतदारसंघात महायुतीचे महादेव जानकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्यात काँटे की टक्कर झाली आहे. स्थानिक विरुद्ध बाहेरचा, विकास हे मुद्दे शेवटच्या टप्प्यात बाजूला पडले आणि थेट मराठा विरुद्ध ओबसी या मुद्यावर मतदान झाल्याचे चित्र आहे. (Latest Marathi News)
राज्यातील महायुतीच्या सरकारने मराठा आरक्षणावरून समाजाची फसवणूक केल्याची भावना बळावलेली आहे. ओबीसीतून सगे सोयऱ्यांसह मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मदत न करणाऱ्यांना पाडा, असे आवाहन केले होते. याचा मोठा परिणाम परभणी मतदारसंघात दिसून आले. राज्यातील महायुती सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर करत, या आधारे मते मिळण्याचा प्रयत्न केला, पण हा डाव उलटल्याचे चित्र आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीने परभणीत एकगठ्ठा मते मिळवून आम्हाला विजय मिळू शकतो, हा संदेश जानकर यांना उमेदवारी देत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या रणनितीचा भाग म्हणून याकडे पाहिले जात असले तरी याच ओबीसी मतांचा आग्रह महायुतीच्या जानकरांसाठी अडचणीचा ठरू पाहत आहे. महाविकास आघाडीचे संजय जाधव यांना मराठा आरक्षणामुळे सरकारविरोधात असलेल्या रोषाचा थेट फायदा झाल्याचे बोलले जाते. याशिवाय ओबीसी आणि मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवण्यात जाधव यांना यश आल्याचे बोलले जाते.
महादेव जानकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक भाजपच्या आमदार, नेत्यांवर सोपवली होती. कुठल्याही प्रकारचा दगाफटका जानकरांना होऊ नये, यासाठी आता काम केले नाही, तर विधानसभेत तिकीट कापले जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांनी जानकर यांच्यासाठी जोर लावला.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घेतलेली सभा, राज्यातील भाजपचे बडे नेते, अजित पवार, धनंजय मुंडे या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जानकरांविरुद्ध आघाडीकडून केल्या जाणाऱ्या बाहेरचा उमेदवार या प्रचारातील हवा देखील काढून टाकण्यात यश मिळवले. परंतु शेवटच्या टप्प्यात निवडणुकीचा प्रचार हा पुर्णपणे मराठा विरुद्ध ओबीसी अशा वळणावर गेला आणि यात वंचितचे पंजाबराव डख व इतर अपक्ष उमेदवार दूर फेकले गेले.
परभणी मतदारसंघात झालेल्या मतांची विभागणी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन पक्षातच झाली. विजयाचे दावे दोन्ही बाजूंनी केले जात आहेत, मताधिक्याचे आकडे सांगितले जात आहेत. प्रत्यक्षात मात्र परभणीत महायुतीच्या महादेव जानकरांच्या (Mahadev Jankar) शिट्टीचा आवाज घुमला असला तरी संजय जाधव यांची मशाल पेटण्यापासून ते रोखू शकतात का? याबद्दल शंका उपस्थितीत केल्या जात आहेत. महायुतीची शिट्टी वाजणार ? की जाधवांची मशाल पेटणार याची उत्सुकता सगळ्यांनाच असणार आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.