परभणी महापालिकेसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्थानिक राजकारणात नवा ताण निर्माण झाला आहे.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि वरिष्ठ नेते सुरेश वरपडूकर यांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे.
नव्या आरक्षणामुळे अनेक नेत्यांची गडं धोक्यात आली असून, आगामी निवडणुकीत नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.
शिवाजी वाघमारे
Local Body Election 2025 : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीत अनेक जागा महिलांसाठी राखीव झाल्यामुळे वर्षानुवर्षांपासून पालिका सदस्य राहिलेल्या, विविध पदे उपभोगलेल्या दिग्गजांना मोठा धक्का बसला आहे. तसेच काही दिग्गजांच्या जागा कायम राहिल्या आहेत. त्यामुळे आरक्षण सोडतीत 'कहीं खुशी कहीं गम'चे चित्र आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि सुरेश वरपूडकर यांचा आता महापालिका ताब्यात घेण्यासाठी कस लागणार आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मंगळवारी (ता. ११) आरक्षणनिश्चितीसाठी सोडत काढण्यात आली. या सोडतीतून आगामी निवडणुकीचे चित्र जरी स्पष्ट झाले असले, तरी ही सोडत अनेकांसाठी धक्का देणारी ठरली. तर काही सदस्यांच्या आनंदात भर पडली आहे. महानगरपालिकेत तथा नगरपालिकेत 20-25 वर्षांपासून सातत्याने निवडून येणारे शिवसेनेचे सदस्य अतुल सरादे यांच्या प्रभाग क्रमांक चारमधील अनुसूचित जाती प्रवर्गाची जागा महिलांसाठी राखीव झाली आहे.
याच प्रभागातील शिवसेनेचे प्रशास ठाकूर यांची अनुसूचित जमाती प्रवर्गाची जागा आता महिलांसाठी राखीव झाली आहे. प्रभाग क्रमांक आठचे माजी नगरसेवक अब्दुल कलीम यांची नागरिकांचा मागास प्रवर्गाची जागा आता महिलांसाठी राखीव झाली आहे. प्रभाग क्रमांक दहामधील व अनेक वर्षांपासून पालिकेचे सदस्य असलेले बालासाहेब बुलबुले यांची नागरिकांचा मागास प्रवर्गाची जागा महिलांसाठी राखीव झाली आहे.
राखीव जागा सर्वसाधारण झाल्याने पेच
प्रभाग क्रमांक 16 चे सुशील कांबळे मानखेडकर यांची अनुसूचित जाती प्रवर्गाची जागा आता महिलांसाठी राखीव झाली आहे. त्यामुळे या मातब्बरांना एक तर कुटुंबातील महिला सदस्यांना निवडणुकीत उभे करावे लागेल, अथवा अन्य पर्याय शोधावे लागणार आहेत. महिलांसाठी राखीव असलेल्या अनेक जागा सर्वसाधारण झाल्यामुळे अनेक माजी सदस्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. माजी महापौर अनिता रवींद्र सोनकांबळे, माधुरी विशाल बुधवंत, नम्रता संदीप हिवाळे, संगीता राजेश दुधगावकर, अखिल तरन्नुम परवीन अ. परवीन, वनमाला देशमुख, महमदी बेगम अहेमद खान यांच्या जागा सर्वसाधारण झाल्या असून, त्यांचे पती, दीर किंवा अन्य नातेवाईक निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. माजी नगराध्यक्षा जयश्री खोबे यांच्यापुढेही पेच निर्माण झाला आहे.
अनेक माजी सदस्यांच्या बाजूने कौल
अलीखान मोईनखान, शेख फईद, चाँद सुभाना जाकेरलाला, अमरीका बेगम अ. समद, शेख फरहत सुलताना, महेमूदखान, चंद्रकांत शिंदे, सचिन देशमुख, उषा झांबड, मीना वरपुडकर, हुसैनी स. इम्रानलाला, सुनील देशमुख, गुरमीरखान कलंदरखान, वैशाली विनोद कदम, जाहेदा बेगम शेख रहीम, माजी उपमहापौर सय्यद समी स. साहेबजान, विद्या जाधव, संतोषी सुनील देशमुख, डॉ. वर्षा खिल्लारे, विजय जामकर, पठाण नाजनीन शकील मोहियोद्दिन, नागेश सोनपसारे, तांबोळी जाहिदा परवीन अ. हमीद, अमोल पाथरीकर, शेख अकबरी साबेरमुल्ला, विकास लंगोटे, मंगल मुदगलकर, अशोक डहाळे, रंजना सांगळे, नंदकिशोर दरक, डॉ. विद्या पाटील, सय्यद समरीन बेगम फारुख, विजयसिंह ठाकूर यांच्या जागांवर आरक्षणाचा काहीही परिणाम झालेला नाही.
परंतु, यापैकी बहुतांश जण पुन्हा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत असून, काही जण मात्र आपल्या कुटुंबातील अन्य सदस्यांना संधी देण्याच्या मानसिकतेत आहेत.आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 2012 चे पालिका सदस्य, तसेच 2017 च्या निवडणुकीत पराभूत उमेदवारांसह इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे अनेक प्रभागांत चुरशीच्या लढती होणार असल्याचे स्पष्ट आहे. मागील निवडणुकीत ज्या प्रभागात दोन सर्वसाधारण जागा होत्या. परंतु आगामी निवडणुकीसाठी मात्र एकच सर्वसाधारण जागा राहिली, अशा प्रभागांमध्ये अधिक चुरस निर्माण झाली आहे.
1. परभणी महापालिकेचे आरक्षण केव्हा जाहीर झाले?
महापालिकेचे आरक्षण 2025 निवडणुकांसाठी नुकतेच अधिकृतरीत्या जाहीर झाले आहे.
2. या आरक्षणामुळे कोणत्या नेत्यांना फटका बसला आहे?
अनेक विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग बदलल्याने पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि सुरेश वरपडूकर यांना नवीन रणनीती आखावी लागणार आहे.
3. परभणीतील सत्तासंघर्ष कोणामध्ये आहे?
सत्तेची लढत मुख्यतः महायुतीतील मेघना बोर्डीकर, सुरेश वरपडूकर विरुद्ध महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी रंगणार आहे.
4. आरक्षणाचे निकष काय आहेत?
लोकसंख्या, महिला आरक्षणाचे प्रमाण आणि अनुसूचित जाती-जमातींचे प्रमाण यावर आधारित आरक्षण ठरवले गेले आहे.
5. नागरिकांची प्रतिक्रिया काय आहे?
आरक्षणामुळे काही ठिकाणी नाराजी तर काही ठिकाणी समाधान व्यक्त करण्यात आले असून, सत्तेच्या समीकरणात उलथापालथ अपेक्षित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.