Parbhani News : राजकारणाच्या मैदानात सर्व नियम उलटसुलट होतात याचा अनुभव अनेकदा येतो. म्हणजे स्वपक्षातही विरोधक असतात तर विरोधीपक्षातही हितचिंतक असतात. परभणी जिल्ह्याच्या राजकारणातही असेच चित्र सध्या पहायला मिळते आहे. परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव, जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना बोर्डीकर व पाथरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहन फड यांनी केलेल्या वक्तव्यातून ऋणानुबंध व वाद दोन्ही समोर आले आहेत.
जिल्ह्यातील भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघात रस्ता उद्घाटनाच्या कार्यक्रमास राजकीय वळण लागले. खासदार संजय जाधव यांनी परभणीहून कार्यक्रमस्थळी येताना कार्यकर्त्यांच्या वाहनाच्या ताफ्यासह प्रवेश केला. तसेच त्यांच्या शक्तीप्रदर्शनास जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे विजय भांबळे यांनीही साथ दिली. कार्यक्रमस्थळी बॅनरबाजीही झाल्याने वातावरण चांगलेच तापले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जाधव यांनी बोलताना बोर्डीकर परिवाराचे जाहीर ऋण व्यक्त केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विजय भांबळे हे आमनेसामने होते. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार शिवसेनेचे संजय जाधव व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश विटेकर यांच्यात लढत होती. जाधव यांना दोन्ही निवडणुकीत जिंतूर मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे संजय जाधव यांनी बोर्डीकर यांचे ऋण व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपच्या इच्छुक उमेदवारात बोर्डीकर हे प्रमुख नाव आहे. दुसरीकडे 2019 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान पाथरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाजपचे मोहन फड यांचे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांचे घनिष्ठ संबंध होते. तसेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या फड यांनी अल्पावधीतच पक्षाचा राजीनामा दिला. जाधव आणि फड यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे.
परभणी येथे नुकत्याच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना फड यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत जाधव यांना पाडणे हेच एकमेव ध्येय असल्याचे जाहीर केले. मात्र या वक्तव्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता असल्याने भाजपचे प्रदेश प्रवक्ते डॉ.उमेश देशमुख यांनी तत्काळ स्पष्टीकरण देत कोणाला पाडण्यापेक्षा महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे महायुतीचे ध्येय असल्याचे सांगत सारवासारव केली. जाधव यांचे बोर्डीकर यांच्याशी असलेले ऋणानुबंध व मोहन फड यांच्याशी असलेल्या राजकीय वादाचा हिशोब येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने होणार यात शंका नाही.
(Edited By- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.