Meghana Bordikar News Sarkarnama
मराठवाडा

Parbhani News : परभणीतील भाजपच्या विजयात पालकमंत्री मेघना बोर्डीकरच ठरल्या 'धुरंधर'! विरोधकांना दिला धक्का

BJP victory Parbhani News : परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपच बाहुबली ठरला आहे. 24 जागा जिंकून जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करतानाच पंचायत समित्यांतही 47 सदस्य निवडून आणत भाजपने विरोधकांना धक्का दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

गणेश पांडे

ZP Election Result News : परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपच बाहुबली ठरला आहे. 24 जागा जिंकून जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करतानाच पंचायत समित्यांतही 47 सदस्य निवडून आणत भाजपने विरोधकांना धक्का दिला आहे. या विजयात पालकमंत्री मेघना बोर्डीकर खऱ्या अर्थाने 'धुरंधर' ठरल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेत मोठा भाऊ आणि पंचायत समितीमध्येही बहुमत मिळवत भाजपने कमळ फुलवले आहे.

जगातला सर्वात मोठा पक्ष पण त्यांना परभणीत उमेदवार मिळत नाही, आपले बी फाॅर्म अपक्ष आमदार रत्नाकर गुट्टेना देऊन त्यांचे उमेदवार कमळ चिन्हावर उभे केले, असा आरोप पालकमंत्री मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) यांच्यावर केला गेला. पण हा आमच्या पक्षाच्या रणनीतीचा भाग असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांच आरोप उडवून लावले. आता निकालानंतर भाजपचे प्लानिंग किती परफेक्ट होते हे स्पष्ट झाले आहे.

भाजप (BJP) पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने दोन पंचायत समित्यांमध्ये बहुमत मिळवले आहे तर नेहमी प्रमाणे तीन पंचायत समित्या त्रिशंकू झाल्या आहेत. परभणी जिल्ह्यात भाजपचे 24 सदस्य निवडून आले. त्यामुळे अन्य पक्ष, अपक्षांच्या मदतीने भाजपचा झेंडा फडकणार हे निश्चितच आहे. त्याच बरोबर भाजपने पंचायत समित्यांच्या निवडणुकीत देखील दमदार कामगिरी केली आहे.

भाजपने नऊपैकी चार पंचायत समित्यांत बहुमत मिळविले आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत एकाही ठिकाणी भाजपला बहुमत नव्हते. त्यात सेलू पंचायत समितीमध्ये दहापैकी आठ सदस्य भाजपचे तर दोन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. जिंतूर पंचायत समितीत 20 पैकी 14 सदस्य भाजपचे, तर सहा सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. गंगाखेडमध्ये 14 पैकी नऊ सदस्य भाजपचे तर चार सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे व एक अपक्ष आहे. पालम पंचायत समितीत आठ पैकी सात भाजपचे तर ठाकरेसेनेचा एक सदस्य आहे.

दोन पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

गत निवडणुकीत नऊपैकी चार पंचायत समित्या ताब्यात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणूकीत दोनच पंचायत समित्यावर वर्चस्व राखण्यात यश आले. मानवत पंचायत समितीत आठपैकी सहा सदस्य राष्ट्रवादीचे तर दोन शिवसेनेचे आहेत. सोनपेठ पंचायत समितीत सहापैकी पाच सदस्य राष्ट्रवादीचे तर एक भाजपचा आहे. परभणी, पाथरी व पूर्णा या तीन पंचायत समित्या त्रिशंकू झाल्या आहेत.

परभणी पंचायत समितीत 20 पैकी राष्ट्रवादीचे पाच, भाजप, काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी चार, उध्दवसेनेचे दोन तर अपक्ष एक सदस्य निवडून आला आहे. पाथरी पंचायत समितीत दहा पैकी राष्ट्रवादीचे चार, ठाकरेसेनेचे तीन, काँग्रेसचे दोन तर शिवसेनेचा एक सदस्य आहे. तर पूर्णा पंचायत समितीत 12 पैकी चार भाजपने, तीन ठाकरेसेना, एक राष्ट्रवादी काँग्रेस, दोन अन्य पक्षाचे तर दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.

ठाकरेसेनेची गत निवडणुकीत परभणी व मानवत पंचायत समितीवर सत्ता होती. परंतु यावेळी ठाकरेसेनेसह काँग्रेस पक्षाला मोठे अपयश आले. जिल्ह्यात पंचायत समितीच्या 108 सदस्यांपैकी भाजपचे 47, राष्ट्रवादी काँग्रेसचे 33 , ठाकरे सेनेचे 9, शिवसेनेचे 7, काँग्रेसचे 6 सदस्य तर 4 अपक्ष व दोन अन्य स्थानिक पक्षाचे सदस्य निवडून आले आहेत. महापालिका निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर या निवडणुकीत भाजपने जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT