

New Dehali News : पंजाबमधील विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. या निवडणुका डोळयासमोर ठेवून भाजप व काँग्रेसकडून पावले उचलली जात आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून पंजाबच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू असल्याचे दिसत आहे. त्यातच आता सिद्धू दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला असून भाजप पंजाबमध्ये एका प्रबळ शिख चेहऱ्याच्या शोधात आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राहुल गांधींवर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. काँग्रेसने (Congress) हकालपट्टी केल्याची घोषणा करताच नवज्योत कौर सिद्धू यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. त्यामध्ये त्यांनी राहुल गांधी हे जमिनीवरील वास्तवापासून पूर्णपणे तुटलेले नेते असून ते स्वतःच्याच काल्पनिक जगात वावरत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे.
विशेष म्हणजे काँग्रेससोबत असलेल्या या वादाची ठिणगी काही दिवसांपूर्वीच पडली होती. "पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी 500 कोटी रुपयांची सुटकेस द्यावी लागते," असा खळबळजनक आरोप नवज्योत कौर यांनी केला होता. या विधानानंतर काँग्रेसने त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईखाली निलंबित केले होते, ज्याचे रूपांतर आता हकालपट्टीत झाले आहे.
काँग्रेसने केलेल्या हकालपट्टीनंतर नवज्योत कौर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये भाजपचे कौतुक केले आहे. "भाजपने (BJP) माझे टॅलेंट ओळखून मला २०१२ मध्ये संधी दिली होती." त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कामाचेही कौतुक केले आहे. जरी त्यांनी सध्या भाजपशी संपर्क नसल्याचे म्हटले असले, तरी राजकीय विश्लेषकांच्या मते सिद्धू दाम्पत्य लवकरच भाजपमध्ये परतू शकते, अशी शक्यता वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसापासून नवज्योत सिंग सिद्धू सध्या सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. सध्या ते आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत आहेत. त्यांच्या पत्नीने स्पष्ट केले आहे की, "जर काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला, तरच ते पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय होतील." मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे सिद्धू देखील काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सिद्धू दाम्पत्य पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.