Devendra Fadnavis-Praniti Shinde-Santosh Deshmukh  Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची प्रणिती शिंदेंनी घेतली भेट; फडणवीसांवर केले गंभीर आरोप

Praniti Shinde Meet Deshmukh Family : देशमुख यांच्या कन्येने ‘मला बाहेर पडायला भीती वाटते,’ असे सांगितले आहे. त्यामुळे तिलाही संरक्षणाची गरज आहे.

Vijaykumar Dudhale

Beed, 24 December : संतोष देशमुख खून प्रकरणी बीड पोलिसांवर सत्ताधारी पक्ष आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठा दबाव आणला गेला आहे. तसेच, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून पुढे आले आहे. मात्र, फडणवीस हे विधानसभेत रेकॉर्डवर खोटे बोलत आहेत, असा आरोप सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

काँग्रेसचे खासदार आणि आमदारांनी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर माध्यमाशी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. शिंदे म्हणाल्या, देशमुख यांच्या कन्येने ‘मला बाहेर पडायला भीती वाटते,’ असे सांगितले आहे. त्यामुळे तिलाही संरक्षणाची गरज आहे. कारण, हे लोक पाळत ठेवून, डूख धरून हे करत आहेत. महिलांनाही सोडत नाहीत, अशी भीती या महाराष्ट्रात सध्या आहे.

संतोष देशमुख हे दोन वेळा आदर्श सरपंच होते, त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीन संशयित आरोपी अजूनही फरारी आहेत. त्यांना तातडीने अटक करण्यासाठी सरकार आणि विशेष करून गृह विभागाकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. या खून प्रकरणी विधानसभा आणि संसदेत आवाज उठविण्यात आला, त्यामुळे हे प्रकरण इथपर्यंत तरी पोचले आहे. नाही तर सगळे झाकण्याचा प्रयत्न या सरकारकडून झालेला दिसून येत आहे, असा आरोप प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केला.

शिंदे म्हणाले, परभणीतील सूर्यवंशी यांचे मृत्यूप्रकरणही सरकारकडून दाबण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. सूर्यवंशी यांचा मृत्यू हा मारहाणीमुळे झाला आहे, पीएम रिपोर्टमधून पुढे आले आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत रेकॉर्डवर खोटं सांगतात. ते म्हणतात की, सूर्यवंशी यांचा मृत्यू हा ह्‌दयविकाराने झाला आहे. एवढी तफावत सरकारच्या दोन विभागांत दिसून येत आहे.

परभणी आणि बीडमधील प्रकरणात सरकारकडून पोलिसांवर दबाव आणून ह्या घटना दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आम्ही हे होऊ देणार नाही. यूपी, बिहारपेक्षा महाराष्ट्राची वाईट अवस्था या सत्ताधारी लोकांनी करून ठेवली आहे. लोक भीतीच्या वातावरणात राहतात. या दोन्ही प्रकरणांतील आरोपींना अटक करून मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना न्याय दिला जात नाही, तोपर्यंत महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार शिंदे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT