
Mumbai, 23 December : राज्याच्या मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने नाराज झालेले छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला रवाना झाले होते. जाता जाता त्यांनी ‘मंत्रिपदाबाबत अजित पवारांशी बोलण्याची गरज वाटली नाही’ असे विधान केले होते, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांचा संवाद थांबलाय की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. खुद्द छगन भुजबळांनी राष्ट्रवादी नेत्यांशी अबोला धरला असला तरी त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द समीर भुजबळ यांनीच याबाबतचे सूतोवाच केले आहे.
महायुती सरकारचा मंत्रिमडळ विस्तार 15 डिसेंबर रोजी झाला. त्या विस्तारात स्थान न मिळाल्याने नाराज छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) तडकाफडकी नागपूर सोडून नाशिकला गेले होते. त्यावेळी त्यांनी ‘होय मी नाराज आहे. या नाराजीबाबत मला कोणाशी बोलायची गरज वाटली नाही,’ असा बॉम्ब टाकला होता. त्यानंतर नाशिकच्या प्रवासादरम्यान त्यांनी लोकसभा, राज्यसभेला आपल्याला कसं डावलण्यात आले, याची इत्यंभूत माहिती दिली. तसेच, राज्यसभेला डावलताना राज्यात तुमची गरज आहे. तुम्ही विधानसभा निवडणूक लढा, असेही सांगण्यात आले आणि आता माझी गरज संपली का, असा सवालही त्यांनी केला होता.
नाशिकात ओबीसींचे नेते आणि कार्यकर्त्यांसमोरही त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यादरम्यान, त्यांचे राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांसोबत संपर्क झाला की नाही कळू शकले नव्हते. मात्र, ओबीसी नेत्यांचा भाजपत प्रवेश करण्यासंदर्भात हेका होता. पण मुरब्बी भुजबळांनी अजूनही आपले पत्ते ओपन केले नव्हते. ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत असताना त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी मात्र अबोला होता. तो अजूनही कायम असल्याचे त्यांच्या आवेशावरून दिसून येते.
छगन भुजबळ यांचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाशी अबोला असला तरी त्यांचे पुतणे, माजी खासदार हे छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात होते. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी त्यांचे फोनवरून बोलणे झाल्याचे सांगण्यात येत आहे. समीर भुजबळ यांच्या माध्यमातून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू आहेत. पक्षातूनही त्यांच्याविरोधात कोणीही बोलणार नाही, याची दक्षता वरिष्ठ नेत्यांकडून घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. त्याला अपवाद फक्त माणिकराव कोकाटेंचा दिसत आहे. कोकाटे हे भुजबळांचे पारंपारिक विरोधक मानले जातात.
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संपर्कात राष्ट्रवादीचे नेते असल्याचे सांगितले जात आहे. सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली आहे. मात्र, आता काही सांगण्यासारखं नाही, असे सांगून समीर भुजबळ यांनी त्या विषयावर बोलणं टाळलं. समीर भुजबळ यांच्या माध्यमातून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला यश येते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
छगन भुजबळ हे एकच दिवस विधानसभेच्या सभागृहात होते. त्यानंतर ते नाशिकला आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही आलो होतो. मुख्यमंत्र्यांसोबत वेगवेगळ्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. येत्या आठ ते दहा दिवसांनंतर पुन्हा भेटायचं, असं त्यांनी सांगितलं आहे, असे समीर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर स्पष्ट केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.