Pritam Munde Sarkarnama
मराठवाडा

Pritam Munde : लोकसभेसाठी प्रीतम मुंडेंनी फुंकलं रणशिंग; म्हणाल्या...

Datta Deshmukh

Beed Political News : 'मी स्वतःहून लोकसभा निवडणुकीची उमेदवार आहे, असे नाव जाहीर करणार नाही, कारण ती भाजपची संस्कृती आहे. परंतु, मित्र पक्षांच्या भावनेचा सन्मान ठेवणेही भाजपची संस्कृती आहे. त्यामुळे तुमच्या भावनेचा सन्मान ठेवून मी लोकसभा निवडणुकीची उमेदवार म्हणून पुढे जात आहे,' असे खासदार डॉ. प्रीतम मुंडेंनी सांगून निवडणुकीसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले.

बीड येथे आयोजित महायुतीच्या मित्रपक्ष संमेलनात डॉ. मुंडे बोलत होत्या. पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह , आमदार प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे, माजी मंत्री सुरेश नवले, शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, मित्र पक्ष संमेलनाचे समन्वयक तथा माजी आमदार अमरसिंह पंडित, आर. टी. देशमुख, भीमराव धोंडे, संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, भीमराव धोंडे आदी मंडळी यावेळी उपस्थित होते. त्यांच्यासमोरच मुंडेंनी आपण लोकसभेसाठी तयार असल्याचे सांगतल्याने महायुतीच्या बीडच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब झाले आहे.

प्रीतम मुंडे (Pritam Munde) म्हणाल्या, 'दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन बीड जिल्ह्याचे लोकसभेत खंबीरपणे प्रतिनिधीत्व करेन. परंतु हा निर्धार केवळ नेत्यांनी न करता महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना करावा लागेल. गत निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष आपल्या सोबत नव्हता. यावेळी त्यांची साथ मिळाली आहे. दिवंगत विनायक मेटे यांचे स्वप्न साकारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत,' असे म्हणत त्यांनी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.

'बीड जिल्ह्याच्या जनतेच्या मनात काय आहे हे मला कळते, म्हणून प्रतिनिधीत्व करण्याची पुन्हा पुन्हा संधी मिळतेय. आता लोकसभेचीही शर्यत आपण जिंकू,' असा विश्वास डॉ. मुंडे यांनी व्यक्त केला. तसेच, महायुतीमधील मित्रपक्ष संमेलनाचे समन्वयक अमरसिंह पंडित यांच्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले.

गोपीनाथ मुंडेंच्या फोटोवरूनही प्रीतम यांनी महायुतीच्या नेत्यांना चिमटे काढले. 'सबका साथ, सबका विकास हा दिवंगत मुंडे यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावनेचा आपल्याला प्रचंड आदर आहे. त्यांच्या पश्चात त्यांची प्रतिष्ठा कायम आहे, हे गौरवास्पद आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नावाशिवाय राज्यात भाजप असूच शकत नाही. तरीही प्रोटोकॉलच्या नावाखाली त्यांचा फोटो टाळणे उचित नाही. यापुढेही असे होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी. कारण दिवंगत गोपीनाथ मुंडे हा जनभावनेचा विषय आहेत,' याची आठवणही त्यांनी करून दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, सुरुवातीला भाजपसह मित्रपक्षांच्या नेत्यांनी भाषणात प्रीतम मुंडे उमेदवार असतील, असा उल्लेख केला. भाजपचे रमेशराव आडसकर यांनी डॉ. मुंडेंच्या उमेदवारीच्या मुद्द्यावर जोर दिला होता. हा धागा पकडत संमेलनाचे समान्वयक अमरसिंह पंडितांनीही यात कुठीच शंका नाही असे म्हटले होते. यानंतर प्रीतम मुंडेंनी यांनी आपले मत मांडून सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांच्या भावनांचा आदर असल्याचे म्हटले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT