Beed Political News : परळीत झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असलेले राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कौतुकाचे धनी ठरले. तिन्ही प्रमुख नेत्यांच्या भाषणाच्या केंद्रस्थानी देखील धनंजय मुंडेच राहिले.
आतापर्यंत राज्यभरात झालेल्या एकूण 20 शासन आपल्या दारी या कार्यक्रमापैकी परळीतला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सर्वात भव्य आणि रेकॉर्ड ब्रेक असल्याची शाबासकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिली. काल (मंगळवारी) परळी येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बत्तीस हजार लाभार्थ्यांना 749 कोटी रुपयांचे लाभ देण्यात आले.
याच कार्यक्रमाच्या दरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा विकास आराखडा, परळीत कृषी विभागामार्फत हाती घेतलेल्या कृषी महाविद्यालय तसेच इतर एकूण 550 कोटी रुप्यांचंगा विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.
प्रमुख कार्यक्रम असलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे नियोजन मागील महिनाभरापासून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होत होते. मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात सर्व नीटनेटके नियोजन तसेच गर्दी ही मोठी होती. खुद्द धनंजय मुंडे देखील कार्यक्रम पाहून भारावले आणि 'माझीच नजर ना लागो माझ्या या वैभवाला' असे भावोद्गार काढले.
त्यानंतर भाषणाला उठलेल्या अजित पवार यांच्या भाषणाच्या केंद्रस्थानी देखील धनंजय मुंडे हेच होते. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकास कामांचा अजित पवार यांनी उहापोह करत धनंजय मुंडे माझ्याजवळचा असला तरी तो देवेंद्र फडणवीस यांच्या देखील जवळचा असल्याचे सांगितले.
त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला काही कमी पडू दिले जाणार नाही असे हे अजित पवार म्हणाले. चांगल्या कामात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही साथ असते असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या वैद्यनाथ देवस्थानाला केंद्र सरकारचा निधी मिळण्याच्या मागणीचा धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकल्प बाबत केंद्र सरकारला निश्चित शिफारस करतील असा विश्वास दाखवत आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तो मंजूर करून आणू असा विश्वास दिला.
प्रमुख भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सर्व नीटनेटके नियोजन, गर्दी पाहून राज्यात आतापर्यंत कुठेच असा कार्यक्रम झाला नसून आतापर्यंतच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमापैकी हा सर्वात भव्य व रेकॉर्ड कार्यक्रम असल्याची शाबासकी धनंजय मुंडे यांना दिली.
एकूणच मागील महिनाभरापासून या तयारीत लक्ष घालून असलेल्या धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पाहून आणि राज्यातील तीन प्रमुख नेत्यांकडून मिळालेली शाबासकीची थाप धनंजय मुंडे यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी निश्चितच फायदेशीर ठरणारे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.