Marathwada Politics News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत महाराष्ट्र हितासाठी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायला तयार असल्याचे विधान केले. यावर उद्धव ठाकरे यांच्याकडूनही आम्ही जुनं सगळं विसरायला तयार आहोत, म्हणत प्रतिसाद दिला. त्यानंतर संपूर्ण राज्यात याचे राजकीय पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याचे मराठवाड्यातील काय परिणाम होणार? याचा विचार केला तर या नव्या समीकरणाचा फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निश्चित होऊ शकतो.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे गारूड आजही या भागातील तरुणांवर कायम आहे. त्यांच्या भाषणांना होणारी गर्दी, मराठवाडा दौऱ्यांना मिळणारा प्रतिसाद, तरुणांकडून उत्स्फूर्तपणे होणारे स्वागत. आजही राज आदेश आला की रस्त्यावर उतरणारी तरुण मंडळी मराठवाड्यातील अनेक भागात पहायला मिळते. कवेळ सातत्याचा अभाव, राज ठाकरे यांचे वर्षातून किंवा निवडणूक काळातच होणारे दौरे, मनसैनिकांना कालबद्ध कार्यक्रमच दिला जात नसल्याने केवळ निवडणुका आल्या की या पक्षाची आठवण काढली जाते. परिणामी तरुणांची फौज, परखड आणि आक्रमक भूमिका घेणारा नेता असूनही मनसेला मोठी झेप घेता आलेली नाही.
दुसऱ्या पक्षासाठी आपली यंत्रणा राबवण्यातच या पक्षाला धन्यता मानावी लागली आहे. 2024 च्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मनसे मराठवाड्यातील हिंगोली, लातूर, धाराशीव, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे दौरे केले. (Shivsena) हिंगोली, लातूरमध्ये विधानसभेला उमेदवारही दिले. पण त्यांना यश मिळाले नाही. अर्थात पक्षाने तसे प्रयत्नही केले नाही. केवळ मतांचे ध्रुवीकरण करणे हाच या पक्षाचा हेतू होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीचे संदीपान भुमरे यांचे मनसेने काम केले. लोकसभा, विधानसभेसारख्या मोठ्या निवडणुकीत यश न मिळू शकलेल्या मनसेला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून चंचू प्रवेश करण्याची संधी मिळू शकते.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच्या युतीने हे साध्य होऊ शकते. वाटाघाटीत उद्धव ठाकरे राज यांच्या पक्षाला किती झुकते माप देते, यावर ते अवलंबून असणार आहे. तूर्तास राज-उद्धव ठाकरे यांच्या युतीचा सर्वाधिक फायदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होऊ शकतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीत मोठ्या भावाची भूमिका साकारणाऱ्या उद्धव ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीत झालेली घसरण पाहता त्यांचे या आघाडीतील स्थान काहीसे डळमळीत झाले आहे. शिवाय मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा मनसेची साथ अधिक फायद्याची ठरणार आहे.
मनसैनिकांना उर्जा मिळेल..
हीच परिस्थिती मराठवाड्यात देखील आहे. मुंबई, पुणे, नाशिकनंतर सर्वाधिक झपाट्याने शिवसेनेचे विस्तार झाला तो याच मराठवाड्यात. शिवसेनेची वाटचाल जशी झाली, तशीच मनसेचीही मराठवाड्यात झाली. त्यामुळे शिवसेने इतकी नसली तरी राज ठाकरे यांचे नेतृत्व आणि मराठी बाणा या जोरावर मनसेची थोडीफार ताकद या भागात पहायला मिळते. संघटना म्हणून मनसे मराठवाड्यात तग धरून आहे, पण सत्तेचा मार्ग अद्याप त्यांच्यासाठी खुला झालेला नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांची युती झाली तर मात्र हे चित्र बदलू शकते. आज मराठवाड्यात मनसेला ग्रामपंचयात ते लोकसभा अशा कुठल्याही क्षेत्रात प्रतिनिधित्व नाही.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष फुटीनंतरही मराठवाड्यात स्वबळावर तग धरुन आहे. लोकसभा निवडणुकीत परभणी, हिंगोली, धाराशिव या तीन मतदारसंघात पक्षाने विजय मिळवला. विधानसभेत एकूणच महाविकास आघाडीची गाडी घसरली त्याचा परिणाम उद्धव ठाकरे यांच्या पक्षावरही झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता राज-उद्धव ठाकरे यांची युती फलदायी ठरू शकते. शिवसेनेतील फुटीमुळे लागलेली गळती आणि त्यातून कुमकूवत झालेल्या संघटनेला मनसेच्या इंजिनची साथ लाभली तर निश्चितच याचा फायदा महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषदेत होऊ शकतो.
मराठवाड्यात सत्ताधाऱ्यांविरोधात रोष..
विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यातील जनतेला महायुतीने दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण केली नाहीत. विशेषतः शेतकरी कर्जमाफीचा विषय मराठवाड्यात प्रकर्षाने जाणवतो. शेत मालाला हमी भाव हे आश्वासनही हवेत विरले आहे. याचा मोठा रोष मराठवाड्यात पहायला मिळतो. अशावेळी एका भक्कम अशा पर्यायाच्या शोधात लोक आहेत, तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या रुपात एकत्र आला तर त्याला निश्चितच यश मिळू शकेल अशी परिस्थिती आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अजूनही लोकांना सहानुभूती आहे, तर मनसेलाही या निमित्ताने एक निश्चित अशी दिशा मिळू शकते.
शिवसेना आणि मनसेला यासाठी नव्याने संघटनात्मक बांधणी करावी लागेल. पक्ष फुटल्यानंतर निर्माण झालेली पोकळी राज ठाकरे यांच्या साथीने मराठवाड्यात भरून निघू शकेल, असे वाटते. राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे ही महाराष्ट्रातील मराठी माणसांची इच्छा होती आणि आहे. आता महाराष्ट्राच्या हितासाठी दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर त्याला लोकही प्रतिसाद देतील. यातून मनसेला उभारी, तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढे मात्र निश्चित.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.