Chhatrapati Sambhajinagar : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. पक्षाची शकले उडाल्यानंतरची ही दुसरी जयंती. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यातील सत्ताधारी महायुतीला आस्मान दाखवले. पण विधानसभा निवडणुकीत आघाडी जमीनीवर आली. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मराठवाड्यातील लढवलेल्या चार पैकी तीन जागा जिंकत चांगला स्ट्राईक रेट ठेवला. धाराशीव, हिंगोली आणि परभणी या तीन जागा उद्धव ठाकरेंनी जिंकल्या पण पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगरमध्ये सलग दोन वेळा शिवसेनेला पराभवाचे तोंड पहावे लागले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील दारुण झालेल्या पराभवाचे साईड इफेक्ट दिसायला सुरूवात झाली आहे. (Shivsena) शिवसेनेने ज्यांना महापौर, नगरसेवक, आमदार केले ते आज पक्ष सोडून सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. ही संख्या इतकी वेगाने वाढते आहे, की पक्ष रिकामा होतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात थोड्या फार प्रमाणात हेच चित्र असले मराठवाड्याच्या बालेकिल्ल्यात होत असलेली वाताहात वेदनादायक आहे.
संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे आणि काही बोटावर मोजण्या इतके पदाधिकारीच आता शिवसेना (Uddhav Thackeray) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहेत. पक्षातून लोक जात असताना जे होते ते बऱ्यासाठीच, आता तरी नव्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संधी मिळेल, असा एक मतप्रवाह पक्षात आहे. परंतु महापालिका, जिल्हा परिषदेसारख्या महत्वाच्या निवडणुका पाहता पक्षाला लागलेली गळती चांगली कशी म्हणणार.
परभणीतही वर्चस्वाला धक्का..
परभणी जिल्हा शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत महत्वाचा समजला जातो. या जिल्ह्यानेच पक्षाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवून दिले होते. लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघाने पक्ष फुटीनंतरही उद्धव ठाकरेंच्या पक्षाची साथ दिली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही परभणीतून राहुल पाटील हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. लोकसभा आणि विधानसभेची जागा राखल्यानंतरही जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे वर्चस्व कमी होताना दिसते आहे.
भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांना नव्या सरकारमध्ये मंत्रीमंडळात स्थान मिळाले. शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांच्याकडे आले. त्यामुळे परभणी जिल्ह्यात आता भाजप फ्रंटसीटवर आली आहे. दुसरीकडे मराठवाड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागलेली असताना खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील यांच्यातील मतभेदही वाढले आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल पाटील यांनी आपले काम केले नाही, असा आरोप खासदार जाधव यांनी त्यांच्यावर मध्यंतरी केली होता. गंगाखेड विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात लढलेले विशाल कदम हे शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत. नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे बोलले जाते. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका पाहता परभणीत उद्धव ठाकरे यांना पक्ष एकसंध ठेवून त्याच्या वाढीसाठी लक्ष घालावे लागणार आहे.
लातूर-बीडकडे दुर्लक्ष..
कधी काळी बीड, लातूरमध्ये चांगली ताकद आणि संघटन असलेली शिवसेना आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लातूरमध्ये एक-दोन मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिले होते, मात्र त्यांना फारशी चमक दाखवता आली नाही. बीडमध्ये बहुतांश पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणे पसंत केले आहे. मराठवाड्यातील लातूर-बीड या दोन जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फारसा वाव राहिलेला नाही.
धाराशीवमध्ये ताकद कायम
धाराशीव जिल्ह्याने पक्ष फुटीनंतरही परभणी प्रमाणेच उद्धव ठाकरे यांना भक्कम साथ दिली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धाराशीवच्या जागा पक्षाने राखल्या. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, कैलास पाटील या जोडीने आपापल्या जागा तर जिंकल्याच पण जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्वही अबाधित राखले आहे. पक्ष फुटल्याने शक्ती विखुरली गेली असली तरी निष्ठावंतांच्या पाठीशी येथील जनता उभी राहते, हे चित्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीने दाखवून दिले. या जोरावरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा पक्ष बाजी मारेल, अशी अपेक्षा आहे.
हिंगोलीत आष्टीकरांवर मदार
लोकसभा निवडणुकीत हिंगोलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोठ्या मताधिक्याने जिंकली. नागेश पाटील आष्टीकर यांच्या विजयाने जिल्ह्याची सुत्रंही आता त्यांच्या हाती गेली आहे. नुकतीच पक्षाने त्यांच्यावर संपर्कप्रमुख म्हणून देखील जबाबदारी सोपवली आहे.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याची मोठी जबाबादीर खासदार आणि संपर्क प्रमुख म्हणून आष्टीकर यांच्यावर असणार आहे. पक्षाला अद्याप तरी या जिल्ह्यात गळतीचे ग्रहण लागलेले नाही.
जालन्यात सैनिक संभ्रमात..
संभाजीनगर प्रमाणेच शेजारच्या जालन्यात शिवसेनेची मोठी ताकद होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर अर्जून खोतकर आणि त्यांचे समर्थक पक्ष सोडून गेले. लोकसभेची जागा आघाडीत काँग्रेसकडे असल्याने उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फारसा वाव नव्हता. विधानसभेची जागाही काँग्रेसकडे असल्याने पक्षाच्या नेत्यांना आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीची वाट पहावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील वातावर पुन्हा महायुतीच्या दिशेने फिरल्यामुळे दोन दिवसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जालना दौऱ्यात उद्धव ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसू शकतो. एकूणच मराठवाडात पक्ष फुटीनंतर लागलेली गळती रोखण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.