Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve : 'माझ्या मुलाच्या मतदारसंघात मी एक हजार मतांनी मागे, मग...' ; रावसाहेब दानवेंचं विधान!

Jagdish Pansare

Jalna Loksabha Election Result and Raosheb Danve : लोकसभेच्या जालना मतदारसंघात दानवे यांचा महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांनी 1 लाख 9 हजार मतांनी पराभव केला. या पराभवानंतर दानवे यांनी मतदारसंघात आभार दौरा सुरू केला आहे. संभाजीनगर येथील चिकलठाणा भागात झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी महायुतीच्या जिल्ह्यातील नेते, मंत्री, आमदारांमुळे नाही, तर आपण राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे पडलो, असे सांगितले.

'माझ्या मुलाच्या मतदारसंघात मी एक हजार मतांनी मागे आहे. मग त्याने माझ्या विरोधात काम केले असं म्हणायचं का? कोणीही विरोधात काम केलं नाही, एकूणच राज्यातील राजकीय परिस्थीतीचा फटका आमच्या पक्षाला बसला.' असं माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosheb Danve) यांनी म्हटले आहे.

अब्दुल सत्तार(Abdul Sattar)- संदीपान भुमरे या दोन मंत्र्यांसह शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री अर्जून खोतकर यांच्यावर त्यांनी दानवे यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप केला जातोय. अब्दुल सत्तार यांनी स्वतः काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांना आपण मदत केल्याचे जाहीर केले. काळे यांचा सत्कार करत त्यांनी दानवे यांच्याबद्दल माझ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती, मी दानवेंना याची कल्पना दिली होती. काळे माझे चांगेल मित्र आहेत, मी त्यांना मदत केली.' असे जाहीर सांगितले.

मात्र यानंतरही रावसाहेब दानवे यांनी आपल्या पराभवाला इतर कोणाला जबाबदार न धरता राज्यातील राजकीय वातावरणामुळे आपल्याला व पक्षाला फटका बसल्याचे माध्यमांना सांगितले. रावसाहेब दानवे यांच्यासारखा मुरब्बी राजकारणी उघडपणे सत्तार-भुमरे-खोतकर यांना अंगावर घेणार नाही. मुलगा आमदार संतोष दानवे यांच्या भोकरदन मतदारसंघातून आपण पिछाडीवर आहे, हे सांगत त्यांनी गुगली टाकली.

पण म्हणून दानवे विरोधात काम करणाऱ्याना विसरतील असे अजिबात नाही. दानवेंनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया हा त्यांचा माईंड गेम आहे, असे बोलले जाते. आभार दौऱ्याच्या माध्यमातून रावसाहेब दानवे यांनी पुढच्या लढाईची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. लोकसभेला पराभूत झालेले रावसाहेब दानवे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते.

आपण पर्यायी मतदारसंघ शोधला आहे, असा सूचक इशारा फुलंब्री येथील आभार बैठकीत दानवे यांनी दिल्याची माहिती आहे. दानवे यांनी विरोधात काम करणाऱ्या मंत्री, आमदारांवरचे आरोप फेटाळले असले तरी ही त्यांच्या धुर्त राजकारणाची चाल असल्याचे बोलले जाते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT