Solapur News : अक्कलकोट तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटावा, यासाठी मागील काळात भारतीय जनता पक्षाला तीन निवडणुकांत मदत केली, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केला. माजी आमदार म्हेत्रे यांच्या कबुलीनामामुळे सोलापूरच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. (Helped BJP in three elections: congress's Siddharam Mhetre's secret blast)
एकरुख पाणी योजनेवरून अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस नेते तथा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यामध्ये श्रेयावादाची लढाई सुरू आहे. नेत्यांबरोबच कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियामध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार म्हेत्रे यांच्या नव्या वक्तव्याची सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
म्हेत्रे यांनी सांगितले की, एकरुख पाणी योजनेला माजी आमदार (स्व.) बाबासाहेब तानवडे यांनी मंजुरी आणली होती. पण पुढे मी आमदार झाल्यानंतर तत्कालीन शिवसेना-भाजप युती सरकारने एकरुख पाणी योजनेला स्थगिती दिली होती. अक्कलकोटमध्ये विरोधी विचारांचा म्हणजे काँग्रेसचा उमेदवार म्हणून मी निवडून आलो होतो, त्यामुळे युती सरकारने ही योजना गुंडाळली होती.
एकरूख पाणी योजनेला मध्यंतरी सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) मिळण्याची गरज होती. निधी असतानाही तो या योजनेसाठी खर्च करता येत नव्हता, त्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक होती. या योजनेसाठी सुप्रमा मिळाला नसता तर ही योजना आणखी बरेच दिवस रेंगाळली असती. भारतीय जनता पक्षाला मदत केली तरच एकरूख पाणी योजनेला सुप्रमा मिळेल, असे तत्कालीन भाजप सरकारकडून मला निरोप देण्यात आला होता, असे सिद्धराम म्हेत्रे यांनी नमूद केले.
भारतीय जनता पक्षाने घातलेल्या अटीमुळे मी काँग्रेसचा आमदार असूनही माझा नाईलाज झाला होता, त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मदत करावी लागली. तीन निवडणुकांमध्ये मी भारतीय जनता पक्षाला मदत केली, असेही म्हेत्रे यांनी सांगितले. प्रशांत परिचारक यांच्या विधान परिषद निवडणुकीवेळी, तसेच संजय शिंदे यांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी आणि भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांची सोलापूर बाजार समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपला मदत केली, असे म्हेत्रे यांनी कबूल केले.
एकरूख पाणी योजनेसाठी बाबासाहेब तानवडे यांच्यासोबतच माजी मंत्री आनंदराव देवकाते, पार्वतीबाई मलगोंडा, महादेव पाटील, इनायतली पटेल आणि उमाकांत राठोड यांनीही परिश्रम घेतले आहेत, असेही माजी आमदार म्हेत्रे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.