कन्नड : भाजपचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अखेर कन्नड विधानसभा मतदारसंघातून मुलगी संजना जाधव यांना आमदार केलेच. दानवे यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची बनली होती. 'मुलीसाठी बापाने सहन केलं' असे म्हणत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संजना जाधव यांनी मतदारांना भावनिक साद घातली होती. आता त्याच सहन केलेल्या बापाने मुलाला आमदार करत तिला झालेल्या त्रासाचा हिशेब चुकता केला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसते आहे.
कन्नड मतदारसंघात झालेल्या तिहेरी लढतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत पराभूत झाले. ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले, तर हर्षवर्धन जाधव आणि संजना या दोघांमध्ये मुख्य लढत झाली. संजना जाधव यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी मिळवून देण्याची दानवे (Raosaheb Danve) यांची खेळी यशस्वी ठरली. जाधव घराण्याची सून म्हणून संजना यांना जितका राजकीय फायदा झाला नाही, तितका शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने झाला.
2019 मध्ये शिवसेना-भाजप युती असताना उदयसिंह राजपूत यांना 79225 मते मिळाली होती. ती शिवसेनेच्या फुटीनंतर 2024 मध्ये निम्म्याने घटली. (Kannad) ही सगळी मते संजना जाधव यांच्याकडे गेली हे स्पष्ट आहे. या शिवाय गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवार असलेल्या संतोष कोल्हे यांनी तब्बल 43 हजार मते मिळवली होती. ही मते अजित पवार यांच्यामुळे संजना जाधव यांच्या पारड्यात पडली. कन्नड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन आहे.
फुटीनंतर तालुक्यातील बहुतांश सक्रीय नेते, पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत गेले. तर शरद पवारांना मानणारे मोजके पण आता फारसा प्रभाव नसलेले नेते त्यांच्यासोबत राहिले. महाविकास आघाडीचे उदयसिंह राजपूत यांना याचा फटका बसला. या शिवाय तालुक्यात भाजपचे स्वतःचे असे मतदान आहे जे संजना जाधव यांच्याकडे गेले. या सगळ्याचा परिणाम संजना जाधव यांच्या विजयात झाला.
18 हजाराहून अधिक मतांनी संजना जाधव यांना मिळालेला हा विजय महायुतीसाठी महत्वाचा ठरला. या विजयाचे शिल्पकार पडद्यामागून सुत्र हलवणारे रावसाहेब दानवे हे देखील ठरतात. राज्यातील काही हायवोल्टेज पैकी एक असलेल्या कन्नडच्या लढतीत संजना जाधव यांनी विजय मिळवला, जो की अनपेक्षित होता. शिवसेना शिंदे गटामध्ये ऐनवेळी संजना जाधव यांना पक्षात प्रवेश आणि उमेदवारी दिल्याने नाराजीचा सूर होता.
पण एकनाथ शिंदे यांनी कन्नडमध्ये सभा घेऊन नाराजांची समजूत काढत त्यांना कामाला लावले. याचा मोठा परिणाम निवडणूक निकालावर दिसून आला. हर्षवर्धन जाधव यांनी आपली पारंपारिक वोट बॅंक या निवडणुकीतही सांभाळली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 60535 मते मिळाली होती. त्यात पाच वर्षांनी सहा हजारांनी वाढ होऊन हर्षवर्धन यांना 66291 मते मिळाली. उदयसिंह राजपूत यांच्या मतांमध्ये मात्र गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी 34 हजारांची घट झाली.
शिवसेना फुटीनंतर पक्षाशी एकनिष्ठ राहिले, पण त्याचा राजपूत यांना फारसा फायदा झाला नाही. दोन वेळा आमदार राहिलेल्या हर्षवर्ध आणि विद्यमान उदयसिंह राजपूत यांचा नवख्या संजना जाधव यांनी पराभव करत विधानसभेत पहिले पाऊल टाकले आहे. या मागे 'बाप माणूस' रावसाहेब दानवे यांचा सिंहाचा वाटा होता हे नाकारता येणार नाही. या निमित्ताने दानवे यांनी कन्नडच्या राजकारणावरही पकड मिळवली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.