Sambhaji Nagar Mahapalika Eelction 2025 : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मोठा भाऊ कोण? यावरून कायम चर्चा होत असते. गेली वीस वर्ष शिवसेना-भाजप युतीची इथे कायम सत्ता राहिली आहे. महापौर पदासह स्थायी समिती, विविध समित्यांचे वाटप या दोन पक्षांमध्ये व्हायचे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर आता गणित बदलली आहेत. महापालिकेच्या जागा वाटप आणि युतीसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये बोलणी सुरू झाली आहे. महापालिकेत मोठा भाऊ शिवसेना की भाजप? याचीही चर्चा रंगू लागली आहे.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मात्र ना शिवसेना, ना भाजप महापालिकेत एमआयएमच मोठा भाऊ, असे म्हणत सत्ताधारी शिवसेना-भाजपला आव्हान दिले आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत एमआयएमचे 26 नगरसेवक निवडून आले होते. हा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करत होता. तर युती असताना शिवसेनेचे 28 तर भाजपचे 22 नगरसेवक होते. युती करून या पक्षाने सत्ता, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अशी विविध पद उपभोगली होती.
एमआयएम हा एकटा पक्ष दुसऱ्या क्रमाकांवर होता. कोणत्याही पक्षाशी युती न करत आम्ही स्वबळावर 26 नगरसेवक निवडून आणले होते. आता माझा दावा आहे, की महापालिकेत सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून एमआयएम असेल. आमच्या एकट्या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक असतील, त्यामुळे यावेळचे महापालिकेतील चित्र वेगळे असेल, असेही इम्तियाज जलील म्हणाले. आमची वोट बँक मजबूत आहे, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हे स्पष्ट झाले. केवळ मुस्लिमच नाही, तर इतर जाती, धर्माचे लोक सुद्धा आम्हाला मतदान करत असल्याचा दावा इम्तियाज यांनी केला.
महाविकास आघाडीकडून आपल्याला छत्रपती संभाजीनगरसह काही शहरांमध्ये सोबत येण्यासाठीचा प्रस्ताव आला आहे. परंतु जिथे आमची ताकद आहे, तिथे सोबत घेऊन इतर ठिकाणी मुस्लिम मतांवर डोळा ठेवणार असाल तर ते शक्य होणार नाही. आघाडी करायची असेल तर केवळ संभाजीनगर किंवा काही शहरांमध्ये नाही तर संपूर्ण राज्यात करावी लागेल, अशी अट इम्तियाज जलील यांनी घातली आहे.
सत्ताधारी भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्यासाठी जिथे एमआयएमचे उमेदवार नसतील तिथे कोणाला मतदान करायचे? हे आमच्या मतदारांना चांगले माहित आहे. मुंबईत आमच्या लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मते दिली होती, असा दावाही इम्तियाज यांनी केला. आम्हाला जातीयवादी म्हणणाऱ्या पक्षांनी एकदा 'अपने गिरेबान मे झाँक कर देखना चाहिए' असा टोलाही त्यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.