Latur : जिल्ह्याच्या राजकारणात हा जवळचा, तो लाडका, अमका विश्वासू अशा चर्चा नेहमीच होत असतात. विशेषतः भाजपमध्ये अशा चर्चांना नेहमीच उधाण येते. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा विषय असेल तर मग ती अधिक चवीने केली जाते. मात्र, ऊसाच्या गळीप हंगाम लवकर सुरू करण्याची मागणी निलंगेकर यांनी केली होती. ती देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली. त्यामुळे आगामी निवडणूक प्रचारात 'ऊसाचा गाळप हंगामा'ची चर्चा होणार हे नक्की. (Sambhaji Patil Nilangekar)
आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar ) यांनी लातूर जिल्ह्यातील ऊसाच्या गळीत हंगाम सुरू करण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्याकडे मागणी केली होती. गळीत हंगाम लकवर सुरू करणे का गरजेचे आहे? याची कारणे निलंगेकरांनी मुद्देसूद पटवून दिली आणि फडणवीसांनी क्षणाचा विलंब न लावता ती मान्य केली. त्यामुळे दरवर्षी 20 नोव्हेंबरपासून सुरू होणारा गळीत हंगाम यंदा 1 नोव्हेंबरपासूनच सुरू झाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निलंगा येथील बाजार समितीच्या मेळाव्यात बोलतांना निलंगेकर यांनी ही बाब आवर्जून सांगितली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्यामुळेच 20 नोव्हेंबरला सुरू होणारा ऊस गळीत हंगाम एक नोव्हेंबर पासून सुरू झाला. याबाबत आपण स्वतः कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. म्हणूनच मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप झाले असल्याचा दावाही निलंगेकर यांनी केला.
राज्यातील प्रस्थापित कारखानदारांनी 20 नोव्हेंबर पासून गळीत हंगाम सुरू करावा, अशी मागणी केली होती. मात्र भविष्यात वाढणारी उन्हाची तीव्रता, पाणीटंचाईची समस्या यामुळे उसाच्या उत्पन्न तसेच वजनावर परिणाम होईल म्हणून कारखाने लवकर सुरू करण्याची मागणी केली. ही मागणी कॅबिनेटमध्ये ठेवून मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यात माझे साखर कारखाना नसले तरी राज्यातील शेतकरी माझेच आहेत या भावनेने आपण हा निर्णय घेण्यासाठी आग्रह धरला, असे निलंगेकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात अधिक कारखाने असले तरी आंबुलगा (बु ) साखर कारखान्यामुळे ऊस उचल करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. हा कारखाना सुरू झालाने शेतकऱ्यांना यानिमित्ताने पर्याय उपलब्ध झाला असून यंदा आंबुलगा (बु) कारखाना प्रशासनाने चांगला भाव दिला त्यामुळेच अन्य कारखान्याला कमी भाव देता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर त्यामध्ये वावगे काय? असा सवालही निलंगेकर यांनी केला. लातूर जिल्ह्यात मागील दोन वर्षापूर्वी चांगला पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाली आहे.
जिल्ह्यामध्ये मांजरा परिवाराचे सर्वाधिक कारखाने असून संपुर्ण ऊसाचे गाळप होते की नाही याची शेतकऱ्यांना चिंता आहे. निलंगा विधानसभा मतदार संघात जवळपास 14 लाख मेट्रीक टनाची नोंद असून सर्वच कारखाने चांगले गाळप करत असले तरी ऊस शिल्लक राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जागृती व मांजरा परिवारातील कारखान्यांनी मार्चअखेर गाळप पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी गाळपाअभावी जर जिल्ह्यातील ऊस शिल्लक राहीला तर ऐन लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा ऐरणीवर येणार आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.