Sambhaji Patil Nilangekar-Sudhakar Shrungare Sarkarnama
मराठवाडा

Latur Lok Sabha 2024 Constituency : संभाजी पाटील निलंगेकरांनी सांगितले लातूरमधील भाजपच्या पराभवाचे कारण

Jagdish Pansare

Latur, 05 June : काँग्रेसने लातूरची जागा मोठ्या फरकाने जिंकत पंधरा वर्षांनी पुन्हा कमबॅक केले आहे. या विजयाने लातूरची गढी आणखी मजबूत होईल आणि भविष्यात काँग्रेसला जिल्ह्यात अच्छे दिन येतील, असे दिसते. लातूरमध्ये 2009 नंतर पहिल्यांदा काँग्रेस जिंकण्यासाठी लढल्याचे दिसून आले.

भाजपची हॅट्‌ट्रीक रोखण्यात लातूर (Latur) जिल्ह्यातील काँग्रेस (Congress) नेतृत्वाला यश आलेच, पण विजयाचे अंतरही मोठे असल्याने महाविकास आघाडीने घेतलेली मेहनत, नियोजन बद्ध केलेला प्रचार, मुद्दे व्यवस्थितपणे मतदारांपर्यंत पोहोचवले.

नेमकं इथंच भाजपचे जिल्ह्यातील नेतृत्व, यंत्रणा कमी पडली. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar ) यांनी भाजपच्या पराभवाची कारण स्पष्ट करताना याची कबुली दिली.

मराठा आरक्षणाच्या विरोधात सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही बाजू मांडण्यात कमी पडलो, विरोधी काँग्रेस पक्षाने संविधान बदलणार, असा जो अपप्रचार आमच्या विरोधात केला, याचा मोठा फटका आम्हाला बसला, हे ही निलंगेकर यांनी मान्य केले. लातूर मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे डाॅ. शिवाजी काळगे 72 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीच्या सुधाकर शृंगारे यांचा त्यांनी पराभव केला. काळगे यांच्या उमेदवारीपासून विजयी प्रमाणपत्र स्वीकारण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात देशमुख कुटुंब त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे दिसले. काळगे यांची ही निवडणूक देशमुख कुटुंबाने प्रतिष्ठेची केली होती.

सुधाकर शृंगारे पाच वर्ष मतदार संघात न दिसणारे खासदार असा, प्रचार करत त्यांना घरी बसवण्याचे आवाहन अमित, धीरज देशमुख आपल्या प्रचार सभांमध्ये सातत्याने करताना दिसले. मतदारांनी त्याला प्रतिसाद देत शृंगारे यांना घरी बसवण्याचे काम केले. महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेससाठी विधानसभा निवडणुकीआधी मिळालेला हा विजय बूस्टर डोस देणार ठरणार आहे.

भाजपमधील अंतर्गत कुरबुरी, संपूर्ण निवडणूक एकट्या संभाजी पाटील निलंगेकर यांच्या भरवशावर सोडणे, पक्षाला महागात पडले. तर दुसरीकडे शिवाजी काळगे यांच्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी भक्कमपणे राबली. या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांने लातुरात काँग्रेसची खऱ्या अर्थाने घरवापसी झाली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

भाजप आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जातो. सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेसने मिळवलेला हा विजय त्यांचे मनोबल वाढवणारा, तर भाजपचे खच्चीकरण करणारा ठरला आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सुधाकर शृंगारे यांना मिळालेल्या साडेपाच लाख मतांचा आकडा सांगत भाजपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टामुळे भाजपला एवढे मतदान मिळाले. त्यामुळे त्यांनी खचून न जाता नव्या विश्वासाने तयारीला लागावे, असे आवाहन करतानाच मराठा फॅक्टर आणि भाजप लोकसभेत चारसौ पार जागा जिंकला तर ते या देशाचे संविधान बदलतील हा अपप्रचार आम्हाला महागात पडला, अशी स्पष्ट कबुली निलंगेकर यांनी दिली.

आम्ही लोकांमध्ये जाऊन या विषयावर त्यांचा विश्वास संपादन करण्यात कमी पडलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः आपल्या भाषणात संविधान बदलणार हा खोटा, दिशाभूल करणारा प्रचार असल्याचे सांगितले. पण मतदार विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडले आणि ते आमच्यापासून दुरावले.

आम्ही नव्याने काम करू आणि जिल्ह्यात भाजप सशक्त करू. जिल्ह्याच्या विकास कामात राजकारण आणणार नाही. काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार शिवाजी काळगे यांना विजयाच्या शुभेच्छा देतानाच विकास कामासाठी सोबत काम करण्याची आमची तयारी असेल, अशी ग्वाही संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरमधील पराभवाचे मंथन करताना दिली.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT