Latur News, 8 May : महायुती-महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदान झाल्यानंतर सर्वांचे आभार मानत विजयाचे दावे केले. पण, मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आल्यावर सगळ्यांचेच टेन्शन वाढले. 2019 च्या तुलनेत लातूर लोकसभा मतदारसंघातील ( Latur Lok Sabha Constituency ) मतांची टक्केवारी दहा टक्क्यांनी घटली आहे. आता हा मतदानचा घटलेला टक्का कोणाची वाट लावणार? हे चार जूनच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे ( Sudhakar Shrangare ) आणि महाविकास आघाडीचे डॉ. शिवाजी काळगे ( Shivaji Kalge ) यांच्यात थेट लढत झाली. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी लातूरमध्ये येऊन सभा घेतली. तर, काळगे यांच्यासाठी राहुल गांधी ( Rahul Gandhi ), प्रियंका गांधी ( Priyanka Gandhi ) यांनी उदगीरमध्ये सभा घेत जोर लावला. भाजपने लातूरमधून विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर बऱ्याच दिवसांनी महाविकास आघाडीने काळगे यांच्या नावाची घोषणा केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
स्थानिक, उच्चशिक्षित, नवा चेहरा म्हणून काँग्रेसने काळगे यांना मैदानात उतरवत त्यांच्यासाठी जोरदार प्रचार केला. भाजपचे विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे पाच वर्ष मतदारसंघात फिरकले नाही, हा मुद्दा प्रकर्षाने काँग्रेसकडून उपस्थित केला गेला. मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी आणल्याचे श्रेय घेणाऱ्या भाजपला डिवचताना या फॅक्टरीतून पहिली बोगी खासदार म्हणून काळगेच बाहेर काढतील, असा हल्ला आमदार अमित देशमुख ( Amit Deshmukh ) यांनी भाजपवर चढवत कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
त्याला भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील-निलंगेकर ( Sambhaji Patil Nilangekar ) यांनी लातूरच्या पाणी प्रश्नाला देशमुखच कसे जबाबदार आहेत, लातूरकरांचे पाणी त्यांनी स्वतःच्या कारखान्यात वळवले, असे आरोप करत भाजपने देशमुखांवर हल्ला चढवला. त्यामुळे गेली दोन आठवडे लातूर जिल्हा आरोप-प्रत्यारोप अन् दावे-प्रतिदावे यांनी गजबजून गेला होता.
मंगळवारी ( 7 मे ) प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले गेले. हे करताना त्यांनी घाई केली, असेच म्हणावे लागेल. कारण, उशीरा मतदानाची आकडेवारी समोर आली तेव्हा मतदारांमध्ये यावेळी फारसा उत्साह नव्हता, असे दिसून आले. गेल्या लोकसभा निवडणुकीत 65 टक्के मतदान झाले होते, ते यावेळी पाच टक्क्याने घटून 60 वर आले.
त्यामुळे केंद्रात विद्यमान सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी आहे का? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. त्यामुळे जे मतदान झाले ते कोणाच्या बाजूने गेले याची गोळाबेरीजही महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरु केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रखर उन्हामुळे मतदार घराबाहेर पडलेच नाही, असेही बोलले जाते. एकूण घटलेल्या मतांच्या टक्केवारीमुळे कोणाची वाट लागणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.