Chhatrapati Shivaji Maharaj statue News : सिंधुदुर्गच्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात शिवप्रेमी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे. या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र दौऱ्यावर नुकतेच येऊन गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर माफी मागत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
पण एक मिटवावे तर दुसरे समोर येते, अशीच काहीशी अवस्था राज्यातील महायुती सरकारची झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी महायुतीच्या कारभाराचे वाभाडे काढणारा प्रकार समोर आणला आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळला त्यासाठी 2 कोटी 40 लाखांचा खर्च करण्यात आला.
नेमका एवढाच खर्च या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी करण्यात आल्याचा दावा खासदार ओमराजे यांनी केला आहे. हा दावा करतांना त्यांनी या हेलिपॅडसाठी काढण्यात आलेल्या निविदा आणि तारखांमधील तफावतीकडे लक्ष वेधत महायुतीच्या काराभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ओमराजे यांनी या संदर्भात एक ट्विट करत महायुती सरकारचा कारभार म्हणजे दारापेक्षा खिडक्या महाग असा दळभद्री असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Shivsena) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 2.40 कोटींचा आणि पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरतं हेलिपॅड उभारण्याचा खर्च आहे 2.02 कोटी. वारेSS व्वाSS सरकार! घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग असाच या सरकारचा दळभद्री कार्यक्रम म्हणावा लागेल. 78 लाख 44 लाख अणि 79 लाख असा खर्च तीन तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी राज्य सरकारने केला.
सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे टेंडर डिसेंबर 2023 मध्ये निघालं आणि वर्क ऑर्डर मात्र दोन महिने आधीच सप्टेंबर 2023 मध्ये देण्यात आल्या. याचाच अर्थ गाव वसण्याआधीच लुटेरे हजर होते. तात्पुरतं हेलिपॅड उभारण्यासाठी एवढा खर्च येतो का ? आणि दलाली खाण्यासाठी एवढ्या किमतीचं टेंडर काढलं जातं का ? यावर संशोधन होणं गरजेचं आहे. राज्य सरकारने यावर उत्तर द्यावं ! अशा शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी महायुती सरकारकडून सुरु असलेल्या कारभाराचे वाभाडे काढले.
कोट्यावधी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तर कोसळलाच, पण तितकाच खर्च मोदी व त्यांच्यासोबत आलेल्या नेत्यांचे हेलिकाॅप्टर उतरवण्याच्या व्यवस्थेवर खर्च करण्यात आल्याचे ओमराजे यांनी निदर्शनास आणून दिले. हे सरकार कंत्राटदारांचे सरकार आहे, असा आरोप विरोधक का करतात? हेच यावरून स्पष्ट होते, असे आता बोलले जाऊ लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.