Sanjay Gaikwad Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Gaikwad News : सतत कायदा हातात घेणाऱ्या संजय गायकवाडांना शिंदे-फडणवीस-पवारांचाही धाक उरला नाही का?

Eknath Shinde, Devendra Fadnavis : राज्यातील काही राजकीय नेते सतत बेताल वक्तव्ये करतात. त्यात बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांचा पहिला क्रमांक लागतो.

अय्यूब कादरी

Buldhana Political News : कायद्याचे पालन नाही केले तर कारवाई केली जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवारांनी दिला आहे. मात्र, मनोज जरांगे-पाटलांना इशारा देणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बुलढाण्याचे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांना सूट देऊन ठेवली आहे काय, असाच प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील काही राजकीय नेते सतत बेताल वक्तव्ये करतात. त्यात बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांचे (Sanjay Gaikwad) नाव पहिल्या क्रमांकावर आहे. धमक्या देणे, मारहाण करणे यासाठी ते कुप्रसिद्ध आहेत. आपल्यातील गुंड प्रवृत्तीचे त्यांनी अनेकदा ओंगळवाणे प्रदर्शन केलेले आहे. त्यांनी सोमवारी पुन्हा तसेच कृत्य करत शिवसेना सोडून स्वगृही काँग्रेसमध्ये परतलेल्या नगरसेवकांना धमकी दिली आहे. यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शब्दही काढला नाही. त्यामुळे कायदा सर्वांसाठी समान असतो, याचा राज्यकर्त्यांना विसर पडला की काय, अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही राजकीय नेत्यांनी ताळतंत्र सोडलेला आहे. मानमरातबच्या चौकटी उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. याविरोधात मात्र कोणीही बोलायला तयार नाही. सार्वजनिक जीवनात काम करत असताना कसे बोलायला हवे, याचे प्रशिक्षण संबंधित पक्षांनी अशा नेत्यांना देण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकसभेची निवडणूक अजून जाहीर व्हायची आहे. त्यानंतर काय पाहावे लागले, याचीच चर्चा आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील, पण भाषेचा स्तर किती खालावणार, याचीच गेल्या काही दिवसांपासून रंगीत तालीम सुरू आहे का, असा प्रश्नही आता केला जात आहे.

मोताळा नगरपंचायतीतील काँग्रेसच्या 12 पैकी आठ सदस्यांनी काँग्रेस सोडून आमदार गायकवाड यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला होता. विकासासाठी निधी देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यावेळी दिले होते. मात्र, निधी मिळाला नाही. तसेच आमदार गायकवाड यांनीही शहरात विकासकामे केली नाहीत, असा संबंधित सदस्यांचा आरोप आहे. त्यामुळे हे नगरसेवक पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये परतले. यात महिला सदस्यांची संख्या जास्त आहे. असे असूनही चिडलेल्या आमदार गायकवाडांनी त्यांना थेट धमकीच दिली आहे. शिवसेना सोडून जाणाऱ्या या नगरसेवकांचे येत्या 15 दिवसांत काय होते बघा, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.

आमदार गायकवाड हे बेताल वक्तव्ये करण्यासाठी कुप्रसिद्ध झाले आहेत. एका तरुणाला त्यांनी पोलिसांच्या समोरच काठीने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन करण्याऐवजी गायकवाडांनी कायदा हातात घेतला. सत्ताधारी गोटात असल्यामुळे आणि आपल्यावर कुणीही, कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नाही, याची खात्री असल्यानेच असे कृत्य आमदार गायकवाडांनी केल्याची चर्चा आहे.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही आरोप केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कायदा हातात घेतल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. अति झाले की मी करेक्ट कार्यक्रम करतो, असे मुख्यमंत्री शिंदे हे जरांगे-पाटील यांचा संदर्भ देत म्हणाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता मुख्यमंत्री शिंदे अति करणाऱ्या आमदार गायकवाडांचा करेक्ट कार्यक्रम कधी करणार? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमदार गायकवाडांना कायदा हातात न घेण्याची सूचना कधी करणार, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT