Pune Political News : महायुतीत पूर्वीचे कट्टर विरोधक आता एकत्र आलेल्या भाजपत मित्रपक्ष झाले आहेत. युतीत असूनही त्या पक्षांतील नेत्यांमध्ये खटके उडताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या असताना इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांतील संघर्ष शिगेला पोचला आहे. माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राष्ट्रवादीचे नेते धमकी देत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. (Indapur Politics)
मित्रपक्षातील लोक जाहीर भाषणात धमकावत असल्याने आम्ही मतदारसंघात फिरायचे की नाही? जर उद्या काही झाले तर त्याला जबाबदार कोण? असे सवालही पाटलांनी (Harshvardhan Patil) पत्राद्वारे उपस्थित केले आहेत. त्यांच्या या पत्रानंतर इंदापूरसह पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी हर्षवर्धन पाटलांचा गैरसमज झाला असून, त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.
पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांची महायुतीची बैठक सोमवारी पुण्यात पार पडली. या वेळी गारटकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पाटलांच्या पत्राबाबत छेडले. त्यावर गारटकरांनी (Pradeep Garatkar) हर्षवर्धन पाटील यांचे पत्र वाचण्यात आले. त्यांनी अशाप्रकारचे पत्र का दिले, याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गारटकर म्हणाले, हा महायुतीच्या अंतर्गत घटक पक्षांचा विषय आहे. आम्ही त्यांच्याशी भेटून चर्चा करणार आहोत. त्यांचे समज- गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. इंदापूरमध्ये (Indapur) यापूर्वी कधीही अशाप्रकारे धमकी देण्याचे राजकारण झालेले नाही. पाटलांना कोणी धमकी देईल असे वाटत नाही. मात्र, त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर कोणाच्या वक्तव्यामुळे त्यांना असे वाटले याची स्पष्टता येईल, असे मतही गारटकरांनी व्यक्त केले.
इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharne) हे बाकी काही बोलतील, मात्र कोणाला धमक्या देणार नाहीत. राजकारणात आरोप-प्रत्यारोप चालतात. मात्र, ते अशा धमक्या देणार नाहीत, असे स्पष्टीकरणही गारटकरांनी दिले. मी माहिती घेतली असून, पाटलांना कुणीही धमकी दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून धमकी कधी दिली? कुणी दिली? आणि कुठे दिली, याबाबतची माहिती घेणार आहे. मात्र, आजची ही बैठक सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी आहे. आम्ही पुढील काळात अशा बैठकींच्या माध्यमातूनच समन्वय साधणार आहोत, असेही गारटकरांनी सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.