Parbhani Shivsena News Sarkarnama
मराठवाडा

Parbhani News: उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' करत शिंदेंची शिवसेना का गाठली? खासदार संजय जाधवांनी सगळंच सांगून टाकलं

Operation Tiger News: ऑपरेशन टायगर अंतर्गत परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून त्यांच्यावर टीका होत आहे. मतदारसंघातही त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर संजय जाधव यांनी पक्ष सोडण्याचे कारण, महायुतीच्या नेत्यांकडून मिळालेले आश्वासन, शब्द आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Jagdish Pansare

Shivsena News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडण्याचा निर्णय जड अंतकरणाने घ्यावा लागला ही वस्तुस्थिती आहे. पण निधी मिळत नव्हता, कार्यकर्त्यांची कामे होत नव्हती, आपण सत्ताधारी पक्षात गेलं पाहिजे असा त्यांचाही आग्रह होता. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना सांगूनही त्यांनी संघटना वाढीकडे दुर्लक्ष केले. आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्रात फिरवा, शिवसैनिकांशी संवाद साधायला सांगा, अशी विनंती केली, पण त्यांनी ऐकले नाही. परिणामी एक एक करून आमदार, खासदार, पदाधिकारी पक्ष सोडून गेले, अशा शब्दात खासदार संजय जाधव यांनी पक्ष सोडण्याचे प्रमुख कारण सांगीतले.

आमचा डीएनए धनुष्यबाणाचा आहे, त्यामुळे शिवसेनेतच प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. परभणी मतदारसंघात विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द त्यांनी मला दिला आहे, त्यामुळे आता मनात काहीही किंतू परंतू ठेवू नका, असे आवाहनही संजय जाधव यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केले.

ऑपरेशन टायगर अंतर्गत परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून त्यांच्यावर टीका होत आहे. मतदारसंघातही त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर संजय जाधव यांनी पक्ष सोडण्याचे कारण, महायुतीच्या नेत्यांकडून मिळालेले आश्वासन, शब्द आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.

तसं बघितलं तर आमचा डीएनए हा धनुष्यबाणाचाच. सुरुवातीपासून 1989 ला पहिली लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार होते अशोकराव देशमुख. त्यांच्या रूपाने परभणी जिल्ह्याला पहिला खासदार लाभला. तेव्हा पक्षाला धनुष्यबाण निशाणी आणि शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. तेव्हापासून आजपर्यंत सगळ्या निवडणुका या धनुष्यबाणाच्या चिन्हावरच लढल्या गेल्या.

आजही आपण सर्वजण वंदनीय शिवसेनाप्रमुखांनी घालून दिलेल्या या सगळ्या वाटेवर चालत आहोत. आम्ही आजही बाळासाहेबांचे विचार विसरलेलो नाही. परंतु शिवसेनेचे काम करत असताना सामाजिक बांधिलकी ठेवून काम करण्याचा मानस शिवसेनाप्रमुखांनी शिकवला. समाजसेवा हीच ईश्वर सेवा अंगी बाळगून आम्ही सातत्याने या ठिकाणी शिवसेनेचे काम करत राहिलो.

मी तर शिवसैनिक म्हणून काम करत होतो. 1986 पासून नंतर शाखाप्रमुख झालो 91 ला मला नगरपालिकेची उमेदवारी देण्यात आली. मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही चारी उमेदवार हिंदूचे आम्ही आपसात लढलो आणि पडलो. एक मुस्लिम नगरसेवक थोडेसे मतं असलेला आमच्यातील फाटाफूटीमुळे निवडून आला.

मी 1993 ला शिवसेनेचा शहर प्रमुख झालो, शहरप्रमुखाचे काम करत असताना नगरपालिका लढवण्याचा योग आला. पण मी दीडशे मतांनी पराभूत झालो. तरी सातत्याने मी काम करत राहिलो, नंतर मी जिल्हाप्रमुख होण्याअगोदर नगरपालिकेची 2001 ची निवडणूक लढलो. नगरपालिकेचा सदस्य झालो. त्यानंतर मी शिक्षण विभागाचा सभापती झालो, शिवसेनेचा जिल्हाप्रमुख झालो, आमदार झालो पण कुठूही थांबलेलो नाही. तेव्हापासून हा प्रवास चालू आहे. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही सगळ्यांनी शिवसेनेचे काम केलंय. आम्ही बघितलं नाही त्या काळामध्ये अनेक आंदोलन झाली, दंगली झाल्या आम्हाला जेलमध्ये जावं लागलं. नामांतराचा लढा देताना आम्ही जेलमध्ये होतो पण आम्ही कधी खचलो. नाही संघर्ष करूनच आम्ही उदयाला आलो होतो.

व्यासपीठावर बसलेले जेवढे काही नेते मंडळी आहेत, त्या सगळ्यांनी आयुष्यामध्ये संघर्ष करूनच हे सगळं काही मिळवलेलं आहे. म्हणून आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. बाळासाहेबांच्या विचाराशी आम्ही एकरूप होतो, मध्यंतरी शिवसेनेमध्ये विभाजन झालं. आम्ही मूळ शिवसेना आणि उद्धव साहेबांसोबत राहिलो याच्यामध्ये काही दुमत असण्याचे कारण नाही.

पण आता आमच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला जातो. पैसे घ्यायचे असते तर 2022 मध्ये गेलो असतो. परंतु, आम्ही पक्षाशी बांधिलकी ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु भविष्यामध्ये पक्षांमध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडायला पाहिजे होत्या, 2022 नंतर पक्षाने जी उभारी घ्यायला पाहिजे होती, ज्या पद्धतीचा संघर्ष अपेक्षित होता तो होताना आम्हाला दिसला नाही.

तरी देखील आम्ही 2024 मध्ये त्यांच्यासोबत राहूनच लढलो. पण त्यानंतरचा कार्यकाळ आम्ही बघतोय की संघटना दिवसेंदिवस कमी होताना आम्हाला अनुभवायला येत होती. आम्हाला कार्यकर्त्यांचे पाठबळ होतं, पण आपल्याला आता इथं राहून जमणार नाही, कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांना भरपूर निधी मिळायचा, चांगली विकासाची काम करायला संधी मिळायची आणि आम्ही विरोधात असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी सरकारमधले लोक डावलण्याचं काम करत होते.

म्हणून कार्यकर्त्याचं मनोबल खचत गेलं आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण झालं. कार्यकर्त्याला वाटायला लागलं की कुठेतरी आपण सत्तेच्या रूपाने जर या प्रवाहात आलो तर आपली संघटनात्मक चांगली बांधणी होईल. पक्षाचे काम करता येईल आपल्याला विकासाचं काम करता येईल आणि कार्यकर्त्यालाही बळ मिळेल, अशी भावना उराशी बाळगून सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला, आणि आम्हाला बाहेर पडायला भाग पाडलं ही वस्तुस्थिती आहे.

उद्धव ठाकरे नाही, पण आदित्य बाहेर का पडले नाही?

मी अनेकदा उद्धव ठाकरे यांना भेटलो, तुम्हाला बाहेर पडणे शक्य होत नाहीये मला मान्य आहे, पण आदित्यसाहेबांनी तरी किमान महाराष्ट्राचा दौरा करायला सांगा. एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी आलेत, मुक्कामी थांबलेत सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्या, एवढीच सामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने संघटनेकडे लक्ष द्यायला हवं होतं ते त्यांच्याकडून देण्यात आलं नाही आणि म्हणूनच कार्यकर्त्यांमध्ये दिवसेंदिवस नैराश्य वाढत गेलं. यातून काही लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हे सत्ताधारी पक्षाकडे वळले आणि आम्हाला सुद्धा जड अंतकरणाने भूमिका घ्याव्या लागल्या, असेही संजय जाधव यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT