

Shivsena UBT News : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी चक्क महायुतीच्या पॅनलमधून अर्ज भरला. जिल्हा बँकेची निवडणूक ही सहकार क्षेत्राशी निगडीत, शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. इथे राजकीय जोडे बाहेर ठेवून आलं पाहिजे, असे म्हणत दानवे यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले.
तर विधान परिषदेत महाविकास आघाडीचे विरोधी पक्षनेते राहिलेल्या अंबादास दानवे यांनीच महायुतीकडून लढावे, याला काय म्हणावे? असा टीकेचा सूर त्यांच्या पक्षातील नेत्या सुषमा अंधारे, नेते चंद्रकांत खैरे यांनी काढला आहे. अंबादास दानवे यांच्या महायुतीकडून लढण्याच्या निर्णयाने महाविकास आघाडी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिघाडी झालीच आहे, पण त्यांच्याकडे संशयाने देखील पाहिले जात आहे.
यात राज्याचे सामाजिक न्याय तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनीही भर टाकली आहे. अंबादास दानवे यांच्या या निर्णयाकडे राजकीय दृष्टीने पाहू नका. दानवे यांनी सहकाराच्या भावनेतून हा निर्णय घेतला आहे. महायुती अधिक बळकट व्हावी, जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काही तरी चांगले करता यावे? हा त्यांच्या भूमिके मागचा विचार आहे.
आम्ही त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते स्वतः महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवत आहेत. सहकार क्षेत्रातील या निवडणुकीसाठी अंबादास दानवे यांनी महायुतीच्या हातात हात मिळवला आहे. हा हात त्यांनी भविष्यातही कायम ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच दानवे यांना चक्क शिवसेनेते येण्याची ऑफरच दिली.
राज्यात एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फोडले. आता ऑपरेशन टायगर-३ राबवून ठाकरेंचे बारा आमदार फोडण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. अशावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मराठवाड्यात धुरा सांभाळणारे, विधान परिषदेत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या अंबादास दानवे यांच्यासारख्या चेहऱ्यालाच फोडण्याचा प्रयत्न शिंदेंच्या सेनेकडून सुरू नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.