Minister Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

Minister Sanjay Shirsat: मंत्री संजय शिरसाट यांच्या `ग्रॅन्ड वेलकम`ची शिवसेनेकडून तयारी!

Sanjay Shirsat will receive a grand welcome : आता छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद त्यांना मिळते का? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी नागपूर हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. शनिवारी संजय शिरसाट हे संभाजीनगरमध्ये येणार आहेत.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे शनिवारी छत्रपती संभाजीनगरात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेटपदी वर्णी लागल्यानंतर शिरसाट यांचे शहरात पहिल्यादांच आगमन होत आहे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुंबईत पार पडलेला शपथविधी, त्यानंतर मुंबईत विधीमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन पार पडले. तर 16 डिसेंबरपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. त्यामुळे संजय शिरसाट संभाजीनगरमध्ये येऊच शकले नाही.

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात संजय शिरसाट यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. (Shivsena) अद्याप खातेवाटप झाले नसले तरी संजय शिरसाट व त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नागपूरात शिरसाट यांच्यातील आत्मविश्वास बळावल्याचे त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट दिसते आहे. गेल्या अडीच वर्षापासून मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या शिरसाट यांना अखरे 'टीम देवेंद्र'मध्ये संधी मिळाली.

आता छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद त्यांना मिळते का? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी नागपूर हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. शनिवारी संजय शिरसाट हे संभाजीनगरमध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून त्यांच्या भव्य-दिव्य स्वागताची तयारी सुरू आहे. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी यासाठी नुकतीच जिल्ह्यातील पदाधिकरी, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन स्वागताची तयारी सुरू केली आहे.

चिकलठाणा विमानतळापासून संजय शिरसाट यांच्या त्यांच्या संपर्क कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिरसाट यांना मंत्रीपद मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले आहेत. शिरसाट यांच्यासह प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार, प्रा. रमेश बोरनारे आणि संजना जाधव, विलास भुमरे हे नवे चेहरे देखील पहिल्यांदा निवडून आले आहेत.

संजय शिरसाट जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर मतदारसंघाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चांगला निधी मिळेल, अशी अपेक्षा हे आमदार बाळगून आहेत. अब्दुल सत्तार पालकमंत्री असतांना निधीचे समान वाटप झाले नाही, अशी ओरड झाली होती. यात देखील दुरुस्ती करण्यात येईल, असे सूतोवाच संजय शिरसाट यांनी केले होते.

शहर व जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि गुंडगिरीवर कुठल्याही परिस्थित आपण अंकुश लावणार असल्याचे सांगत शिरसाट यांनी इशारा दिला होता. एकूणच शिरसाट यांच्या मंत्रीपदामुळे शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शनिवारी शहरात पुन्हा एकदा दिवाळी साजरी होणार असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT