swarupanand deshmukh  Sarkarnama
मराठवाडा

Massajog Sarpanch Election Result News : मस्साजोगमध्ये बाहेरचा राजकीय हस्तक्षेप वाढला, अन् मतदारांनी भाकरी फिरवली!

Massajog Sarpanch result News : दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दीड वर्षांनी झालेल्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला.

Jagdish Pansare

Beed Politics News : दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दीड वर्षांनी झालेल्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला. संतोष देशमुख यांचे खंडणी प्रकरणातून अपहरण आणि त्यानंतर झालेल्या निर्घृण हत्येनंतर राज्यातील राजकीय वातवरण ढवळून निघाले होते. गेल्या दीड वर्षात बीड जिल्हा आणि राज्यात या प्रकरणावरून अनेक घडामोडी घडल्या.

या निमित्ताने मस्साजोगची चर्चा दिल्लीपर्यंत झाली. गावात राजकीय नेते, मंत्री, खासदार, आमदारांचा वावर वाढला. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेकऱ्यांना फासावर पोहचवण्याचा लढा आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यापर्यंत हा हस्तक्षेप योग्यही होता. परंतु गावाच्या कारभारात जेव्हा बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप वाढू लागला तिथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्यायासाठी पाठिंबा द्यायचा, पण गावगाडा हाकताना गावाचे हित जोपासायचे असा विचार अनेक दिवसांपासून पुढे आला होता.

यातूनच धनंजय देशमुख यांनी राजकीय दबाव आणून सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध काढण्याचा प्रयत्न केला. गावातील आपले विरोधक कोण आहेत? कोण दगाफटका करू शकतात? याचा पुरेपूर अंदाज धनंजय देशमुख यांना आला होता. त्यामुळेच स्वतः उमेदवार न होता अश्विनी देशमुख यांना निवडणुकीत उभे करण्याची खेळी त्यांनी केली. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे असलेली सहानुभूती अश्विनी देशमुख यांना मिळेल आणि त्या विजयी होतील, असा त्यांचा अंदाज होता.

परंतु, सरपंच पदाची निवड बिनविरोध करण्याच्या हालचाली या धनंजय देशमुख यांच्याच बाजूने म्हणजेच एकतर्फी सुरू होत्या. गावातील विरोधी गटाला या प्रक्रियेत सहभागी करून न घेता राजकीय दबावातून निवडणूक बिनविरोध निघेल हा प्रयत्न सपशेल फसला. स्वरुपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल लागणार याचा अंदाज आला होता. आज प्रत्यक्षात घडलेही तसेच.

स्वरुपानंद देशमुखांचे तगडे आव्हान

स्वरुपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत अश्विनी देशमुख यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संजीवनी देशमुख यांना माघार घ्यायला लावण्यात स्वरुपानंद देशमुख यशस्वी ठरले आणि अर्धी लढाई ते तिथेच जिंकले. संजीवनी देशमुख यांची माघार आणि पाठिंबा मिळाल्याने स्वरुपानंद देशमुख यांचा आत्मविश्वास वाढला. निम्मे गाव आपल्या पाठीशी असल्याचा त्यांनी केलेला दावा खरा ठरला.

स्वरुपानंद देशमुख यांनी प्रचारात कुठेही संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे निर्माण झालेली सहानुभूतीला ठेच पोचणार नाही याची काळजी घेतली. संतोष देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा हीच आपली भूमिका आहे. त्यासाठी मी व सगळं गाव आजही रस्त्यावर उतरायला तयार आहे. पण राजकीय भूमिका मात्र आमची वेगळी असेल असे स्पष्ट करत स्वरुपानंद यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी आपल्याशी कोणी संपर्क केला नाही? बाहेरचे लोक येऊन जर गावातील निर्णय घेत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही? अशी आक्रमक भूमिका स्वरुपानंद देशमुख यांनी घेतली. अश्विनी देशमुख यांची निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती, त्यांना इतरांनीच भरीस पाडल्याचा दावा स्वरुपानंद यांनी केला. यातून अश्विनी देशमुख निवडून आल्या तर कारभार धनंजय देशमुख यांच्या हाती जाईल, असा सूचक संदेशही स्वरुपानंद देशमुख यांनी मतदारांना दिला.

मतदानाच्या दिवशी गावात झालेला राडा यातून अश्विनी देशमुख, धनंजय देशमुख यांना गावकऱ्यांचा किती विरोध आहे? याचा अंदाज आला होता. राज्यासाठी मस्साजोगचा निकाल जरी धक्कादायक वाटत असला तरी तो अपेक्षित होता याची चाहूल गेल्या काही दिवसांपासून लागली होती. दरम्यानच्या काळात घडलेले बीड कारागृहातील कथित आॅडिओ क्लीप प्रकरण, त्यात धनंजय देशमुख यांच्या साडूचा आलेला उल्लेख याचाही फटका कुठे तरी अश्विनी देशमुख यांना बसला असावा.

नेत्यांनी पाठ फिरवली!

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील बहुतांश राजकीय नेत्यांनी धनंजय देशमुख व त्यांच्या कुटुंबियाला न्यायालयीन लढ्यात साथ दिली. खासदार बजरंग सोनवणे, भाजपचे आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेकांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जेलमध्ये टाकण्यापर्यंतच्या लढ्यात भक्कम पाठिंबा दिला.

सरपंच पदाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीही सुरेश धस, बजरंग सोनवणे प्रयत्नशील होते. सोनवणे यांनी तर ही निवडणूक बिनविरोधच होईल, असे ठामपणे सांगीतले होते. परंतु प्रत्यक्ष निवडणूक लागल्यानंतर राजकीय नेत्यांनी पडद्यामागून बऱ्याच हालचाली केल्या. अगदी मतदानाच्या दिवशी बजरंग सोनवणे हे मस्साजोगमध्ये होते, पण गावात ते फिरकले नाहीत.

राजकीय हस्तक्षेपामुळे गावकरी नाराज असल्याचा अंदाज असल्यानेच राजकीय नेत्यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली होती. सरपंच पदासाठी काल 84 टक्के मतदान झाले. या पैकी निम्याहून अधिक मतेही स्वरुपानंद देशमुख यांच्या पारड्यात पडली. 92 मतांनी त्यांनी अश्विनी देशमुख यांच्यावर विजय मिळवला. यावरून गावकऱ्यांचा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला राजकीय नाही तर न्यायालयीन लढाईसाठीच पाठिंबा होता हे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT