Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad vishnu chate  sarkarnama
मराठवाडा

Beed Court News: संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपींच्या वकिलांची कोर्टात धक्कादायक मागणी, सुनावणी पुढे ढकलली

Santosh Deshmukh case court hearing : मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटला बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडसह अन्य आरोपींवर हत्या, अपहरण, खंडणी आणि संघटित गुन्हेगारीशी संबंधित गंभीर आरोप आहेत.

Jagdish Pansare

Beed News : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यापूर्वीच्या अनेक सुनावणीमध्ये आरोपींकडून खटला लांबवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता. सगळे पुरावे दिल्यानंतरही आरोपींचे वकील हे कोर्टाकडे नवे अर्ज करून वेळ पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिले होते.

बीडच्या विशेष मकोका न्यायालयात मंगळवारी (ता.25 ऑगस्ट) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत प्रामुख्याने पेनड्राईव्ह-डिजिटल पुराव्याची प्रत आरोपींच्या वकिलांना देण्याच्या मागणीवरून युक्तिवाद झाला आणि त्यावर पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण पुढे ढकलण्यात आले. पुढील सुनावणी 1 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे.

आरोपींच्या वकिलांकडून तपासातील पेनड्राईव्हमधील डिजिटल पुराव्याची कॉपी मागण्यात आली. या डिजिटल पुराव्याशी संबंधित कागदपत्रे, माहिती आरोपींच्या बचाव पक्षाला उपलब्ध करून देण्याचा मुद्दा न्यायालयासमोर आला. त्यामुळे आजच्या सुनावणीत मुख्य खटल्यातील साक्ष-पुराव्याच्या पुढील टप्प्याला अपेक्षित असलेली प्रगती झाली नाही.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटला बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडसह अन्य आरोपींवर हत्या, अपहरण, खंडणी आणि संघटित गुन्हेगारीशी संबंधित गंभीर आरोप आहेत. न्यायालयाने यापूर्वी आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले असून आरोपींनी हे आरोप नाकारले आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर डिजिटल पुरावे जमा केले आहेत. आरोपींच्या मोबाईलमधील व्हिडिओ, फोटो, कॉल रेकॉर्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक डेटा हा तपासातील महत्त्वाचा भाग आहे. आरोपींच्या मोबाईलमधून हत्येशी संबंधित 15 व्हिडिओ आणि 8 फोटो मिळाल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.

बचाव पक्षाचा मुख्य आक्षेप असा आहे की, सरकारी पक्षाने सादर केलेल्या डिजिटल पुराव्याची संपूर्ण प्रत त्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर यापूर्वीही लॅपटॉपची क्लोन कॉपी देण्याची मागणी करण्यात आली होती. बचाव पक्षाने सरकारी पक्षाकडून केवळ त्यांना सोयीचा डेटा दाखवला जात असल्याचा आरोप केला होता.

वकिलांचा आक्षेप काय?

बचाव पक्षाच्या म्हणण्यानुसार तपासात जप्त केलेल्या लॅपटॉप, पेनड्राईव्हमधील संपूर्ण डेटा त्यांना पाहता आला पाहिजे. डिजिटल पुराव्यात काही निवडक भाग दाखवून उर्वरित माहिती लपवली जात नाही ना, हे तपासण्याचा अधिकार आरोपींना आहे. त्यामुळे संबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणाची क्लोन कॉपी-पूर्ण डिजिटल प्रत बचाव पक्षाला मिळावी.

न्यायालयानेही आवश्यक असल्यास संबंधित उपकरणातील संपूर्ण डेटा स्वतः तपासावा, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. डिजिटल पुरावा हा या प्रकरणातील घटनाक्रम आणि आरोपींच्या परस्पर संपर्काशी संबंधित असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. विशेषतः हत्या करण्यापूर्वी, हत्येदरम्यान आणि त्यानंतर आरोपींचे फोन, व्हिडिओ आणि कॉल्स यांचा तपास करण्यात आला आहे.

मात्र, एखादा व्हिडिओ किंवा डिजिटल फाइल तपासात सापडणे आणि तो न्यायालयात कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य पुरावा ठरणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्याची मूळता, तो डेटा कुठून मिळाला, त्यात फेरफार झाला आहे का आणि संबंधित इलेक्ट्रॉनिक पुराव्याची कायदेशीर पूर्तता झाली आहे का? हे बचाव पक्षाकडून तपासले जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT