Abdul Sattar Eknath Shinde sarkarnama
मराठवाडा

Minister Abdul Sattar : सत्तार है, तो मुमकीन है ; गर्दी जमवत मुख्यमंत्र्यांना दाखवली ताकद..

Sattar's perfect planning, Chief Minister Shinde impressed :मतदारसंघावर मजबूत पकड आणि कोणतीही सभा, मेळावा, कार्यक्रम यशस्वी कसा करायचा? यात हातखंडा असल्याने अब्दुल सत्तार यांचे परफेक्ट नियोजन पाहून सगळेच चकीत होतात. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी सत्तार यांच्या मतदारसंघात हा पहिला अनुभव नव्हता.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Shivsena News : अब्दुल सत्तार यांनी काल आपल्या मतदारसंघातील लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यासाठी मोठी गर्दी जमवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गर्दी पाहून चकित झाले, सिल्लोड-सोयगाव सारख्या मतदारसंघात हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. गर्दी जमवण्यात अब्दुल सत्तार एक्सपर्ट आहेत, यात त्यांचा कोणी हात पकडू शकत नाही, हे त्यांनी अनेकदा दाखवून दिले आहे.

पालकमंत्री पदासाठी पक्षात स्पर्धा असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून ते मिळवत अब्दुल सत्तार यांनी आपल्या शब्दाला किती वजन आहे, हे दाखवून दिले होते. पालकमंत्री झाल्यानंतर मतदारसंघात होणाऱ्या पहिल्याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार शक्तीप्रदर्शन करत नव्या सरकारमध्ये आपले मंत्रीपद सत्तार यांनी काल नक्की केले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

मतदारसंघावर मजबूत पकड आणि कोणतीही सभा, मेळावा, कार्यक्रम यशस्वी कसा करायचा? यात हातखंडा असल्याने अब्दुल सत्तार यांचे परफेक्ट नियोजन पाहून सगळेच चकीत होतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी सत्तार यांच्या मतदारसंघात हा पहिला अनुभव नव्हता. याआधी पहिल्यांदा मतदारसंघात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी सत्तार यांनी चिकलठाणा विमानतळापासून ते थेट सिल्लोड पर्यंत जय्यत स्वागताची तयारी केली होती.

स्वतःच्या मतदारसंघात होणार नाही, त्यापेक्षा मोठे आणि प्रचंड गर्दीत सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत आपल्या मतदारसंघात केले होते. कालच्या लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यात शिंदे यांनी दुसऱ्यांदा सत्तार (Abdul Sattar) यांच्या नियोजनाचा अनुभव घेतला. विधानसभा निवडणुकीच्या आधी एकदा मुख्यमंत्र्यांना मतदारसंघात आणून आपली ताकद आणि मतदारसंघातील वर्चस्व दाखवण्यात सत्तार कमालीचे यशस्वी झाले. साठ हजार महिलांच्या उपस्थितीत मग एकनाथ शिंदे यांचे भाषणही चांगलेच रंगले होते.

सत्तारांना व्हायचे जिल्ह्याचा नेता..

अब्दुल सत्तार यांची आतापर्यंतची राजकीय वाटचाल पाहिली तर त्यांना कोणाच्या नेतृत्वात काम करायला आवडत नाही. स्वतः नेतृत्व हाती घेऊन आपल्या पाहिजे ते साध्य करण्याची त्यांची कार्यपद्धती राहीली आहे. काँग्रेसमध्ये आपल्याला डावलून लोकसभेचा उमेदवार दिला म्हणून त्यांनी थेट पक्षच सोडला होता. स्वतःच्या पक्षाचा उमेदवार असताना उघडपणे विरोधी उमेदवाराला मदत करायला आणि जाहीरपणे ते कबुल करायला सत्तार मागे पुढे पाहत नाहीत.

याचे ताजे उदाहरण म्हणजे लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे देता येईल. महायुती असताना अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांना मदत केल्याचे जाहीरपणे सांगितले. आगामी विधानसभा, त्यानंतर होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्याची सगळी सुत्र आपल्या हाती असावीत, असा सत्तार यांचा प्रयत्न सुरू आहे. ती मिळाली तर जिल्ह्यात शिवसेनेचा नेता म्हणून अब्दुल सत्तार यांचाच चेहरा असेल.

प्रासंगिक कराराची आठवण, मी सच्चा शिवसैनिक नाही, मुख्यमंत्र्यांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंतच शिवसेनेत राहील, असे सांगत सत्तार यांनी दबावतंत्र वापरले. त्याचा त्यांना फायदाही झाल्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी आल्यावरून सिद्ध झाले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ताब्यात घेऊन सत्तार यांनी शिंदे यांना आपल्या राजकीय ताकदीची झलक याआधीच दाखवली आहे.

आता विधानसभेत कन्नड या ठाकरे गटाकडे असेल्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी शिंदेंनी सत्तार यांच्यावर सोपवली आहे. विधानसभा निवडणुकीत ही जागा जर सत्तार यांनी निवडून आणली तर पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्तार यांचा शब्द प्रमाण मानला जाईल. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ सत्तार यांनी मजबुतीने बांधला आहे, त्यांना आता जिल्हाभरात आपला विस्तार करायचा आहे.

राज्याचा मंत्री म्हणून सत्तार यांचे सगळ्याच राजकीय पक्षात संबंध आहेत. ते वेळेनूसार आणि गरजेनूसार वापरतात हे वारंवार दिसून आले आहे. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापुर्वी घरी जाऊन घेतलेली भेट आणि काल मुख्यमंत्र्यांशी त्यांची आदर्शच्या ठेवीदारांचा विषय घेऊन झालेली भेट याचे कनेक्शन स्पष्ट होते.

इम्तियाज जलील हे मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आदर्शच्या ठेवीदारांसाठी इम्तियाज जलील सातत्याने लढा देत आहेत. त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटला तर इम्तियाज जलील यांना निश्चित फायदा होणार आहे. विधानसभेत इम्तियाज यांचा विजय झाला तर वैयक्तिक सत्तार यांच्यासाठी ती मोठी राजकीय खेळी ठरेल, असे बोलले जाते.

सत्तार यांचा मार्ग मोकळा..

मी मुळचा शिवसैनिक नाही, असे जाहीरपणे सांगणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या हातात जिल्ह्यातील शिवसेना सोपवण्याची वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर येण्याची शक्यता आहे. संदीपान भुमरे लोकसभेवर निवडून गेले आहेत, त्यामुळे त्यांचा संघटना वाढीसाठी फारसा उपयोग होणार नाही. संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यातून विस्तव जात नाही. सत्तांतरानंतर राज्यातील मंत्रीमंडळात संधी मिळावी, यासाठी दोघांमध्ये झालेली वादावादी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोरच झाली होती.

प्रदीप जैस्वाल हे आमदार असले तरी ते संघटनात्मक कामात फारसे सक्रीय नाहीत. आमदार बोरनारे वैजापूर पुरते मर्यादित आहेत. राजेंद्र जंजाळ यांना मर्यादा आहेत, शिरसाट यांचा शब्द त्यांच्यासाठी महत्वाचा असतो. आगामी विधानसभा निवडणुकीत आहे त्या जागा राखून कन्नडची जागा जिंकायची असेल तर जिल्ह्यात प्रभाव टाकू शकेल अशा नेतृत्वाची शिंदे गटाला गरज आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर पुर्णपणे विश्वास शिंदे टाकतील का? याचे उत्तर सध्या तरी ठामपणे देता येत नाही.

पण मग त्यांच्यासमोर दुसरा पर्याय कोणता? याचा विचार केला तर दुर्दैवाने त्याचे उत्तर नाही हेच आहे. सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रभावित केले आहे, हे कोणी नाकारणार नाही. पण सत्तार यांची विश्वासहार्यता नसल्याने, किंवा त्यांना अधिकार दिले तर ते पक्ष दावणीला बांधल्यासारखे होईल, अशी भिती सच्चे शिवसैनिक व्यक्त करताना दिसतात. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील शिवसेनेचे नेतृत्व सच्चा शिवसैनिकाकडे जाते, की प्रासंगिक करार करणाऱ्या? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT