Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : 28 वर्षानंतर मिळाला दानवेंच्या जनता दरबारात न्याय ; काय आहे प्रकरण...

Public Court : अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद, 493 तक्रारींचे अर्ज दाखल, 39 प्रकरणांचा जागेवरच निपटारा.

सरकारनामा ब्यूरों

- महेश माळवे

Ambadas Danve : एका 14 वर्षाच्या मुलाने बालसंगोपन योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रश्न मांडताना मदत नाकारत 'हक्काचे पाहिजे', यासाठी धरलेला आग्रह... आणि एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 28 वर्षांनंतर मिळालेला न्याय... अशा अनेक समस्यांचा झालेला निपटारा अंबादास दानवे यांच्या जनाधिकार जनता दरबाराचे फलित ठरले.

नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळावा, शासकीय यंत्रणांकडून त्यांच्यावरील अन्याय दूर व्हावा, या हेतूने शिवसेना उबाठाच्यावतीने राज्यभर 'जनाधिकार' अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, विधानसभा संघटक संजय छल्लारे, तालुकाप्रमुख लखन भगत, राधाकिसन बोरकर, निखिल पवार उपस्थित होते. सातबाऱ्यावर नोंद व्हावी यासाठी ज्येष्ठ नागरिक मच्छिंद्रनाथ गंगाधर भागवत यांनी तहसील कार्यालयात सतत हेलपाटे घातले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

न्यायालयाने आदेश देऊनही अधिकारी सातबाऱ्यावर नोंद करत नाहीत, अशी त्यांनी तक्रार केली. दानवे यांनी कागदपत्रे पडताळून संबंधित रजेवर असलेल्या तलाठी राजेंद्र घोरपडे यांना तातडीने बोलावून घेतले. घोरपडे काही मिनिटांत जनता दरबारी हजर झाले. भागवत यांची कागदपत्रे तपासून अवघ्या दीड तासांत त्यांना आजच्या तारखेची सातबारा नोंद करून प्रमाणपत्र दिले. संपूर्ण परिसर या क्षणामुळे भावनिक झाला होता.

उपस्थित नागरिक व शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. ज्येष्ठ नागरिक भागवत यांना गहिवरून आले, त्यांनी दानवे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आभार मानले. आज तब्बल 28 वर्षांनंतर या ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळाला. तसेच त्रिदेव कापसे या 14 वर्षे वयाच्या मुलाने आपल्याला वडील नाहीत. आई घरकाम करून पालनपोषण करते. त्यामुळे बालसंगोपन योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केला असून गेल्या दीड वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.

मात्र, कोणीही दाद देत नसल्याचे सांगितले. यावेळी दानवे यांनी त्याची चौकशी केली. त्याच्यातील हजरजबाबीपणा पाहून त्यांना कौतुक वाटले. त्यांनी शिवसेनेच्यावतीने मदतीचा हात पुढे केला असता, जे आपल्या हक्काचे आहे तेच मिळावे, अशी स्पष्ट भूमिका त्याने मांडली. त्यावर दानवे यांनी त्याला आर्थिक मदत देत भविष्यात गरज लागल्यास संपर्क साधण्यास सांगितले.

39 प्रकरणांचा जागेवरच निपटारा...

जनता दरबाराला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला. 493 वेगवेगळ्या तक्रारींचे अर्ज करण्यात आले. त्यातील 215 लोकांच्या अडचणीसंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना करण्य़ात आल्या. 39 प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला. उर्वरित प्रकरणे जिल्हाधिकारी, राज्यस्तरावरील असल्याने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून पाठपुरावा केला जाईल. यासाठी अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम कार्यरत आहे, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT