Chandrakant Khaire, shantgiri maharaj  Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire News : शांतीगिरी महाराजांचा पराभव केला अन् खैरेंना मिळाले नवे नाव...

Shivsena Political : दोनवेळा आमदार, मंत्री, चारवेळा सलग खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांना 2009 च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या समर्थकांनी एक दुसरेच नाव दिले. ते होते 'सबसे बडा बाबा, खैरे बाबा', आता हे नाव किंवा उपाधी त्यांना कशी मिळाली याची मोठी रंजक कहाणी आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhaji Nagar News : लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे धार्मिक वृत्तीचे म्हणून ओळखले जातात. त्यांचे धार्मिक कार्य आणि देवावर असलेली श्रद्धा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. दोनवेळा आमदार, मंत्री, चार वेळा सलग खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांना 2009 च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या समर्थकांनी एक दुसरेच नाव दिले. ते होते 'सबसे बडा बाबा, खैरे बाबा', आता हे नाव किंवा उपाधी त्यांना कशी मिळाली याची मोठी रंजक कहाणी आहे.

वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे महामंडलेश्वर मठाधिपती शांतीगिरी महाराज (Shantgiri Maharaj) यांचे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire ) हे निस्सीम भक्त. गुरू म्हणून ते त्यांचा आदर, सत्कार नेहमी करायचे. वेरूळला गेले की शांतीगिरी महाराजांच्या मठाला भेट आणि त्यांचे दर्शन हे ठरलेले असायचे. पण 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शांतीगिरी महाराज याच आपल्या शिष्याच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटून उतरले. शांतीगिरी महाराजांचा जिल्ह्यातील भक्त परिवार, शिष्य पाहता चंद्रकांत खैरे यांचे यावेळी काही खरं नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. (Chandrakant Khaire News)

खैरेंनी स्वतः महाराजांची भेट घेऊन त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी मनधरणी केली. पण महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम होते. विशेष म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रचार आणि मतदानाची प्रक्रिया पार पडेपर्यंत शांतीगिरी महाराज मौन बाळगून होते. मौनगिरी महाराज म्हणून ते ओळखले जायचे. 1999 आणि 2004 मध्ये सलग दोनवेळा निवडून आलेल्या चंद्रकांत खैरे यांची मोठी पंचाईत झाली. विरोधकांना मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या. शांतीगिरी महाराजांचा प्रचार जय बाबाजी म्हणत जिल्हाभरात सुरू होता.

इकडे जसजशी मतदानाची वेळ जवळ येत होती, तसतसे खैरेंचे टेन्शन वाढत होते. बाबाजींमुळे हिंदू मतांचे विभाजन होऊन चंद्रकांत खैरे पराभूत होतील, असा अंदाज सर्वच राजकीय विश्लेषकांनी लावला होता. निवडणूक प्रचार संपण्याच्या दिवशी शांतीगिरी महारांजानी शहरातून रॅली काढत मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. हजारो भक्तांच्या उपस्थितीत निघालेल्या त्यांच्या रॅलीने खैरेंना धडकी भरली होती. अखेर मतदानाचा दिवस उजाडला, मतदान पार पडले. शिवसेना, काँग्रेस, अपक्ष शांतीगिरी महाराज असा सगळ्यांकडून आकडेमोड सुरू झाली. अंदाज वर्तवले जाऊ लागले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खैरेंचे आता काही खरे नाही, असे जेव्हा त्यांचे समर्थक आणि शिवसैनिकही म्हणू लागले, तेव्हा मात्र खैरेंचा रक्तदाब वाढला. खैरेंनी तेव्हा देवाचा धावा करत साकडे घालायला सुरूवात केली. अखेर प्रतीक्षा संपली मतमोजणीचा दिवस उजाडला. फेऱ्यावर फेऱ्यांचे निकाल समोर येत होते, शांतीगिरी महाराज तिसऱ्या क्रमांकावर होते. अगदी शेवटच्या फेरीपर्यंत ते तिसऱ्या क्रमांकावरच राहिले. खैरेंची लढत काँग्रेसचे उत्तमसिंह पवार यांच्याशी झाली. चंद्रकांत खैरे 2 लाख 55 हजार 896 म्हणजेच 42 टक्के मतं मिळवून विजयी झाले.

काँग्रेसच्या उत्तमसिंह पवारांना 2 लाख 22 हजार मते मिळाली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर शांतीगिरी महाराज 1 लाख 48 हजार मत मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले. खैरेंनी 33 हजार मतांनी विजय मिळवत हॅट्ट्रीक केली. मतमोजणी सुरू असताना खैरेंच्या विजयाची खात्री पटली तेव्हाच त्यांच्या समर्थकांनी मिरवणुकीत दाखवण्यासाठी खास बॅनर तयार करून आणले. खैरेंच्या विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापासून त्यांच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली.

मिरवणुकीत झळकलेल्या बॅनर आणि फलकांनी सगळ्यांचे लक्ष वेधले. त्या फलकावर लिहले होते 'सबसे बडा बाबा, खैरे बाबा', बस्सं तेव्हापासूनच जिल्ह्यातील राजकारणातला 'सबसे बडा बाबा, खैरे बाबा' असं चंद्रकांत खैरे यांना उद्देशून म्हटले जाऊ लागले.

शांतीगिरी महाराजांनी दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. यावेळी त्यांनी नाशिक मतदारसंघाची निवड केली आहे. 4 जूनच्या निकालानंतर शांतीगिरी महाराज विजयी होतात, की त्यांना नशीब पुन्हा हुलकावणी देते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. तर इकडे खैरे पाचवा विजय मिळवून पुन्हा 'सबसे बडे बाबा' ठरतात का? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

(Edited by : Sachin waghmare)

SCROLL FOR NEXT