Loksabha Election 2024 : मराठवाडा आणि महाराष्ट्रातील लोकसभेचा अंतिम पाचवा टप्पा पार पडला आणि तेव्हापासून सगळ्याच राजकीय पक्षाच्या उमेदवार, नेत्यांनी देवाचा धावा करायला सुरूवात केली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार डाॅ. कल्याण काळे, संभाजीनगर चे चंद्रकांत खैरे अशी अनेक मंडळी सध्या देवदर्शन करतांना दिसत आहेत.
लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire), महायुतीचे संदीपान भुमरे, एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात झालेली लढत चुरशीची झाली. तीनही पक्षांनी विजयाचा दावा केला आहे. परंतु ईव्हीएममध्ये मतदारांनी कोणाच्या गळ्यात खासदारकीची माळ घातली हे चार जूनच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. तत्पुर्वी चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह तुळजाभवानी मातेचे गुरुवारी दर्शन घेतले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi) सगळे उमेदवार विजयी होऊ दे, तुझी खणा-नारळाने ओटी भरीन, असा संकल्प खैरे यांनी केला. तुळजाभवानी मातेची विधिवत पूजा करून महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील सर्वच उमेदवार निवडून येऊ दे, अशी इच्छा व्यक्त करत खैरेंनी माथा टेकला. तुळजाभवानी मातेने यश दिले तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सर्व विजयी उमेदवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आई तुळजाभवानीच्या दरबारात घेऊन येऊन खणा नारळाने ओटी भरू जागरण गोंधळ घालू, असे साकडे खैरे यांनी यावेळी घातले.
शिवसेना लोकसभा समनव्यक माजी महापौर सुदाम सोनवणे, उपजिल्हाप्रमुख सुधीर लुंगारे, लक्ष्मण गिरे, संतोष जाटवे, सुनील खडके, धनंजय भावले, शाम पवार, शिवसेना उपतालुकाप्रमुख सुनील जाधव, शहरप्रमुख सुधीर कदम, नाना बोरडे, संजय हाके, शिवरत्न पवार आदींनी खैरे यांच्यासोबत तुळजाभवानीचे दर्शन घेतले.
महाराष्ट्रात महायुतीने मिशन-45 चा दावा केला आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने आम्हाला 35-40 जागा मिळतील, असे म्हटले आहे. राज्यभरात विविध वाहिन्यांकडून करण्यात आलेल्या सर्व्हेंमधून काही मतदारसंघामध्ये धक्कादायक निकाल लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात मराठवाड्यातील नांदेड, जालना, संभाजीनगर या मतदारसंघांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.