Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar News : लातूरमध्ये शरद पवारांचा भाजपला दे धक्का! ; 'हा' बडा नेता लावला गळाला

Deepak Kulkarni

प्रशांत शेटे -

Ahmedpur Politics News : महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यात अनेक नेत्यांंनी आगामी राजकीय संधी हेरून आपल्या पक्षातील मुक्काम हलवला आहे.

महाविकास आघाडीसह महायुतीतही हीच परिस्थिती दिसून येत आहे. अनेक दिवसांपासून अलिप्त राहून काय भूमिका घ्यायची, याच्या विचारात अनेक नेते आहेत. त्यात लातूरचे भाजप नेते विनायकराव पाटील यांचाही समावेश आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले होते.

पण आता त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश निश्चित मानला जात आहे. अहमदपूर येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चाचपणी केली. कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये होत असलेल्या गळचेपीबद्दल उद्विग्नपणे भावना व्यक्त केल्या होत्या.

मुंबई येथे त्यांनी शरद पवार(Sharad Pawar), जयंत पाटील यांची भेट घेऊन प्रवेशाचे निश्चित केले आहे. आमदार बाबासाहेब पाटील हे अजित पवार गटात गेल्यामुळे मतदारसंघात शरद पवार गटाला मोठी पोकळी निर्माण झाली असून, विनायकराव पाटील यांच्या रूपाने मोठा मासा शरद पवारांच्या गळाला लागला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चाकूर विधानसभा मतदारसंघात पक्षातील विरोधक व राज्याच्या राजकारणातील उलथापालथीमुळे परंपरागत विरोधक भाजपसोबत गेल्यामुळे मतदारसंघात होणारी अडचण लक्षात घेऊन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला असून, रविवारी (ता.२९) मुंबई येथे त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

अहमदपूर विधानसभेची उमेदवारी २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँगेसने विनायराव पाटील यांना जाहीर केली होती. परंतु माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रेमाखातर विनायकराव पाटील यांनी राष्ट्रवादीऐवजी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवली होती. यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडून आल्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवली. यामुळे २०१९ मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी दिली.

जपमधील दिलीपराव देशमुख व अशोक केंद्रे या दोघांनी बंडखोरी केल्यामुळे मताचे विभाजन होऊन पराभवाला सामोरे जावे लागले. ज्याच्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा पऱाभव झाला, त्यांचा पुन्हा पक्षात प्रवेश करून घेऊन जिल्हाध्यक्षपद बहाल करण्यात आले.

तालुकाध्यक्षांसह इतर पदाधिकारी निवडीमध्ये विनायकराव पाटील यांना विश्वासत न घेतला त्यांच्या समर्थकांना डावलण्यात आले. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी कैफियत मांडली, परंतु त्याच्याकडून दखल घेण्यात आली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील यांनी विनायकराव पाटील यांचा पराभव केला होता, ते सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत आहेत.

त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप व अजित पवार गट एकत्र निवडणूक लढल्यास आपणास उमेदवारी मिळणे अशक्य होणार आहे, तसेच भाजपमध्येही अनेक स्पर्धक आहेत हे लक्षात घेऊन विनायकराव पाटील यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT