MLC Shivsena News : राज्यातील शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या काही खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळवताना बराच त्रास झाला. काहींना उमेदवारी नाकारण्यात आली, तर काहींची जाहीर झालेली उमेदवारी परत घेण्याची नामुष्की एकनाथ शिंदे यांच्यावर ओढावली होती. हिंगोलीची तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांच्याबाबतीत हा प्रकार घडला.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपने हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्या उमेदवारीला टोकाचा विरोध केल्याने एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतले. विद्यमान खासदाराची उमेदवारी कापावी लागल्याचे शल्य मुख्यमंत्र्यांना होतेच. पण या एका निर्णयामुळे वाशिममध्ये विद्यमान खासदार भावना गवळींची उमेदवारी बदलल्याचा फटकाही शिवसेनेला बसला. विद्यमान दोन खासदार कमी झाल्याने मराठवाडा, विदर्भात शिंदे बॅकफूटवर गेले.
बंड पुकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत एकनाथ शिंदेंना अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागले. यातून पक्षात नाराजी तर वाढली, पण शिंदेंचे सरकारमध्ये वजन नाही, असा समजही पसरला. हिंगोलीमध्ये हेंमत पाटील यांना माघार घ्यायला लावून बाबुराव कोहळीकर यांना उमेदवारी दिली, पण त्यांचाही पराभव झाला. एकूणच लोकसभा निवडणुकीतील हा प्रयोग एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या चांगलाच अंगलट आला.
मात्र विधानसभा निवडणुकीला समारे जाण्याआधी या परिस्थितीतून बाहेर पडण्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना यश आले असेच म्हणावे लागेल. बंडानंतर साथ देणाऱ्या माजी खासदार कृपाल तुमाने, भावना गवळी यांना विधान परिषदेवर घेत एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुनर्वसन केले. त्यानंतर माजी खासदार हेमंत पाटील यांचे काय? असा प्रश्न उपस्थितीत केला जात होता. यावर शिंदे यांनी हेमंत पाटील यांची हिंगोली येथील हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी निवड करत त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला.
आता हेमंत पाटील यांचे पुनर्वसन झाले असे वाटत असतानाच हे पद म्हणजे हेमंत पाटील यांना लागलेली आमदारकीची `हळद` होती, हे आता स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी घडवून आणला. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार हेमंत पाटील यांना संधी देत त्यांना आमदार केले.
आधी हिंगोलीच्या हळद संशोधन केंद्राचे अध्यक्षपद आणि आता आमदारकी बहाल करत एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील आणि त्यांच्या समर्थकांची नाराजी दूर केली. (Shivsena) निश्चितच याचा फायदा शिवसेनेला हिंगोली, नांदेड आणि हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून मराठवाड्यात होऊ शकतो. हेमंत पाटील पुर्वीपासून शिवसेनेत काम करत होते. नांदेड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, महापालिकेत नगरसेवक, नांदेड दक्षिण मतदारसंघातून आमदार आणि हिंगोली मतदारसंघातून खासदार असा त्यांचा उंचावत जाणारा आलेख राहिला आहे.
या शिवाय सहकार क्षेत्रातही पाटील आपले पाय भक्कपणे रोवू पाहत आहेत. पत्नी राजश्री पाटील यांना आधी आमदार आणि नंतर खासदार करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. आता तिसऱ्यांदा शिवसेनेकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली जाते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विधानभा निवडणुकीच्या तोंडावर हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील पक्षांतर्गत नाराजी किंवा संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी हेमंत पाटील यांची मोठी मदत होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतात, असा संदेश हेमंत पाटील यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीने दिला गेला आहे. त्यामुळे बंडाच्या पावित्र्यात असलेल्या हिंगोली-नांदेड या दोन्ही जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना थोपवणे सोपे जाणार आहे.
मराठा समाजातील एका नेत्याला एकनाथ शिंदे यांनी न्याय दिला, त्याचे राजकीय पुनर्वसन केले ही बाब पक्षासाठी फायद्याची ठरू शकते. विधान परिषदेवरील निवडीसोबतच आता या दोन्ही जिल्ह्यात शिवसेनेचे अधिकाधिक आमदार निवडून आणण्याची जबाबदारीही हेमंत पाटील यांच्यावर असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.