Chhatrapati Sambhajinagar News : एमआयएम पक्षाने महापालिका निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. गेल्यावेळच्या 24 नगरसेवकांच्या संख्येवरून या पक्षाने 33 वर उडी मारत सगळ्यांनाच धक्का दिला. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी बावीस विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट करत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे धाडस दाखवले. निवडणुकीत त्यांच्या पदयात्रा, वाहन रॅलीवर झालेल्या हल्यातून हे धाडस इम्तियाज यांच्या अंगलट येते की काय? अशी शंका उपस्थित केली जात होती. परंतु जसा महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, तसे आधी व्हिलन ठरलेले इम्तियाज जलील हिरो झाले.
शतप्रतिशत सत्ता मिळविलेल्या भाजप आणि यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला एमआयएमने महापालिकेचे कामकाज सुरू झाले, त्या दिवसापासून आपली ताकद दाखवायला सुरूवात केली होती. पहिल्याच सर्वसाधारण सभेत शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) केल्याबद्दल सत्ताधाऱ्यांकडून आणण्यात आलेल्या अभिनंदन ठरावाला विरोध करत आक्रमक पावित्रा घेत बायकाॅट केले.
शहागंज भागातील हातगाडी, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात महापालिकेच्या कारवाईला विरोध केला. पथकाच्या अंगावर जाऊन त्यांना माघारी धाडले. पण हे प्रकरण त्यांच्या अंगलट आले आणि दहा नगरसेवकांविरुद्ध गुन्हे दाखल होऊन, त्यांना शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल तुमचे नगरसेवकपद रद्द का करण्यात येऊ नये? अशी विचारणा एमआयएमला (MIM) करणारी नोटीस बजावण्यात आली.
एमआयएमच्या नगरसेवकांनी त्यानंतरही पुढील सगळ्या सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठकींमध्ये आपले घोडे पुढे दामटवण्याचा प्रयत्न केला. शहराचे नाव बदललेले असताना जाणीवपूर्वक कार्यालयीन पत्रव्यवहारात ते टाळणे, औरंगाबाद असाच उल्लेख करणे, असे प्रकार सुरू ठेवले. याचाही फटका अर्थसंकल्पातील निधी वाटपात एमआयएमला बसला. स्थायी समिती सभापतींनी छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख निधी मागणी पत्रात असेल तरच निधी मिळेल, असा इशारा दिला.
पण तो हलक्यात घेणे एमआयएमच्या नगरसेवकांना महागात पडले. तीन नगरसेवक असलेल्या वंचित आघाडीला एमआयएमपेक्षा जास्त निधी देत सत्ताधारी भाजपने त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. सर्वसाधारण सभांमध्ये घोषणाबाजी, गोंधळ घालणाऱ्या एमआयएमची कोंडी झाली ती निदा खान प्रकरणात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचे नाव आले तेव्हा.
टीसीएसमधील धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप असलेल्या निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागातून पोलिसांनी अटक केली. ज्या घरात निदा खान आणि तीचं कुटुंब राहत होते, ते घर मतीन पटेल या एमआयएमच्या नगरसेवकाचे असल्याचे समोर आले. यानंतरही पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी, प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे निदा खान आणि मतीन पटेल यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
दरम्यान, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमला घेरण्याची एकही संधी सोडली नाही. काही महिन्यांपूर्वी इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर एमआयडीसीतील भूखंड, व्हिट्स हाॅटेल खरेदी, महापालिकेतील रमाई घरकुल घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप केले होते. अगदी त्यांच्या विरोधात सीबीआय, इनकम टॅक्स विभागाकडे पुरावे सादर करत तक्रारीही केल्या होत्या. त्याचे पुढे काही झाले नाही, हा भाग वेगळा, पण शिरसाट यांनी निदा खान प्रकरणाशी थेट इम्तियाज जलील यांचा संबंध जोडत त्यांना अटक करण्याची मागणी केली.
एकीकडे, शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्या चौकशीसह अटकेची मागणी केली. तर दुसरीकडे महापालिकेने मतीन पटेल यांनी ज्या घरात निदा खान हिला आश्रय दिला होता, ते घर अनाधिकृत असल्याचे सांगत त्यावर बुलडोझर चालवण्याची पूर्ण तयारी केली. या शिवाय त्याचे नगरसेवकपद कसे जाईल, यासाठीही रणनीती आखली. त्यामुळे सत्ताधारी भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांनी सध्या एमआयएमला घेरल्याचे चित्र आहे.
पुढे काय? या आहेत पाच शक्यता..
१. एमआयएमला रोखण्याची चालून आलेली संधी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट सोडणार नाहीत. निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना मास्टर माईंड ठरवत त्यांच्या अटकेची मागणी लावून धरतील.
२. मतीन पटेल याचे घर अवैध ठरवून त्यावर महापालिका प्रशासन बुलडोझर फिरवून एमआयएमला मोठा दणका देईल.
३. भाजपच्या महापौरांनी मतीन पटेल याने अनाधिकृतपणे बांधलेल्या घराचा निवडणूक शपथ पत्रात उल्लेख केला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यातून त्याचे नगरसेवकपद रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते.
4. महापालिकेतील सत्ताधारी भाजप-शिवसेना हे पक्ष एमआयएमवर दबाव वाढवून आपल्याला हवे ते ठराव पारित करून घेण्याचा प्रयत्न करू शकतात.
5. इम्तियाज जलील यांनी सत्ताधाऱ्यांनी घेरले असले तरी त्यांच्यावर पलटवार करण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांत महापालिकेच्या सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत त्यांची जुनी प्रकरण बाहेर काढण्याचा विडा इम्तियाज यांनी उचलला आहे.
प्रशासानावरही त्यांची वक्रदृष्टी असणार आहे. महापालिकेच्या रमाई घरकूल योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यात इम्तियाज यांना यश मिळाले आहे. असेच आणखी काही घोटाळे, त्याचे पुरावे मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील राहून सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.