

Karad, 12 May : इराण आणि अमेरिका युद्धामुळे देशभरासह इंधन टंचाई निर्माण झाली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी आणि परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला महाराष्ट्रातून पहिला प्रतिसाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याने दिला आहे. त्यांनी कुटुंबीयांसोबत नियोजित केलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणातून निर्माण झालेल्या स्थितीमुळे देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. इंधन टंचाई, रुपयाचे अवमूल्यन, संभाव्य महागाई, परकीय गंगाजळीचा प्रश्न यामुळे देश सध्या संघर्षमय परिस्थितीतून मार्गाक्रमण करत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधानांच्या या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याणमंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेली युरोप टूर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांची सुमारे तीन महिन्यांपूर्वी ही कौटुंबीक परदेश सहल ठरविण्यात आली होती. या दौऱ्यात लंडन, पॅरिस आणि ॲमस्टरडॅम या प्रमुख शहरांचा समावेश होता. मात्र, देशहिताला प्राधान्य देत आणि विदेशी चलन बचतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने देसाई यांनी हा दौरा रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे.
राजकीय वर्तुळात या निर्णयाचे स्वागत होत असून ‘देश प्रथम’ या भूमिकेचे हे उदाहरण मानले जात आहे. वैयक्तिक आनंद आणि सुटीपेक्षा राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश या निर्णयातून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
देशहिताला प्राधान्य, जबाबदारीची जाणीव आणि साधेपणाचा संदेश देत शंभूराज देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात कौतुक होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.