MLA Kailas Patil-Balaji kalyankar On Shivsena Political Crisis News Sarkarnama
मराठवाडा

Balaji Kalyankar News : कैलास पाटील सटकले ,पण बालाजी कल्याणकर अडकले! शिवसेनेतील बंडावेळी आले भलतेसलते विचार

MLA Balaji Kalyankar On Shivsena : शिवसेनेत बंडखोरी झाली तेव्हा सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत 25 ते 30 आमदार होते. मुंबईहून सुरतला गेल्यानंतर या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली.

Jagdish Pansare

  1. शिवसेनेतील बंडाच्या काळात आमदार बालाजी कल्याणकर यांनी गच्चीवरून उडी मारण्याचा विचार केला होता, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे.

  2. कल्याणकरांनी सांगितले की, त्या काळात मानसिक तणाव प्रचंड वाढला होता आणि त्यांनी अत्यंत भावनिक अवस्थेत हा निर्णय घेतला होता.

  3. या खुलाशामुळे शिवसेनेतील बंडादरम्यान काय तणाव आणि दडपण होतं, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

Shivsena News : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मोठा राजकीय राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड पुकारले आणि महाविकास आघाडी सरकार गडगडले. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची खुर्चीही गेली. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही एक महत्त्वाची घटना मानली जाते. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले 40 आमदार याला उठाव म्हणतात. या बंडखोरी- उठावाचे अनेक रंजक किस्से यापूर्वी समोर आले आहेत.

धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी मुंबईहून सुरतला जाताना मध्येच स्वतःची कशी सुटका करून घेतली याचा थरार आणि अनुभव कैलास पाटील,अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी यापूर्वीच कथन केलेला आहे. त्यानंतर नांदेड उत्तर मतदार संघातून पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार बालाजी कल्याणकर यांची मनस्थिती उठाव करण्याची नव्हती, त्यांच्या मनात हॉटेलच्या गच्चीवरून उडी मारण्याचा विचार आला होता, असा खळबळजनक दावा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी काल नांदेडमधील एका कार्यक्रमात केला.

याला स्वतः बालाजी कल्याणकर यांनीही दुजोरा दिला. शिवसेनेत बंडखोरी झाली तेव्हा सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत 25 ते 30 आमदार होते. मुंबईहून सुरतला गेल्यानंतर या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली. सुरतहून गुवाहाटीला पोहोचेपर्यंत हा आकडा 40 पर्यंत गेला होता. या बंडामध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या काही नवख्या आमदारांचाही समावेश होता. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरचे प्रा. रमेश बोरणारे हे त्यापैकीच एक. तर नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर यांना संजय शिरसाट व इतर आमदारांनी सहभागी करून घेत गुहाटीला नेले होते.

पहिल्यांदाच आमदार झालेल्या बालाजी कल्याणकर यांच्यासमोर मतदारांना तोंड कसे दाखवावे? असा प्रश्न होता. या चिंतेत त्यांनी हॉटेलमध्ये दोन दिवस जेवणही केले नाही, जेवला नाहीस तर मरशील मग मरणारच असशील तर जेवून मर, असे आपण त्यांना म्हणाल्याचे शिरसाट यांनी आपल्या भाषणात सांगितले. राजकारणात रिस्क घ्यावी लागते, बालाजी कल्याणकर पहिल्यांदाच निवडून आला होता, तो परत गेला असता तर कदाचित त्याला माफी दिली गेली असती. आम्ही मात्र तीन- तीन टर्म निवडून आलेलो आमदार असल्यामुळे आमचे बंड फसले असते तर आमचे राजकीय करियर उध्वस्त झाले असते.

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, माणसं जोडत होतो. हॉटेल वरून उडी मारण्याची भाषा करणाऱ्या बालाजी कल्याणकर यांनी आज आपल्या मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी आणून आम्हालाही मागे टाकले आहे, असेही संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितले. बालाजी कल्याणकर यांनीही संजय शिरसाट यांनी सांगितलेल्या घटनेला दुजोरा दिला. बंड झाले तेव्हा आपली मनस्थिती बरोबर नव्हती. मनात वाईट विचार येत होते, मी दोन दिवस जेवलो नाही.

एवढेच नाही तर हॉटेलच्या गच्चीवरून उडी मारण्याचा विचारही माझ्या मनात आला होता. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आणि इतर शिवसेनेच्या नेत्यांनी मला धीर दिला. सगळं सुरळीत होईल असा विश्वास दिला आणि त्यामुळे मी त्यांच्यासोबत राहिलो, असे कल्याणकर यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्यामुळेच आज मतदारसंघातील अनेक विकास कामे मी करू शकलो. शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळत सर्वाधिक निधी माझ्या मतदारसंघासाठी दिला, असेही कल्याणकर यांनी आवर्जून सांगितले.

कैलास पाटील कसे सटकले?

शिवसेनेच्या या बंडाच्यावेळी धाराशीव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी शिताफीने आपली सुटका करून घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील बंगल्यावर त्यांना बोलावून घेतले होते. तिथून ठाणे महापौर बंगल्यावर गेल्यावर गाडी बदलून दोघे निघाले. ठाणे गेलं, वसई-विरार गेलं, काहीतरी वेगळं घडतंय हे लक्षात येत असतनाच बॉर्डरवर चेकपोस्ट दिसला, चुकीच्या दिशेने नेलं जातंय, हे लक्षात आल्यानंतर. पुढे नाकाबंदी होती, शिंदे यांनी पाटील यांना चालत येता का? असे विचारले आणि कैलास पाटील यांनीही संधी हेरली.

दीड किमीपर्यंत ट्राफिकचा फायदा घेत गाडीचं दार उघडून डिव्हायडर ओलांडून ते मुंबईच्या दिशेने निघाले. तीनशे-चारशे मीटर गेल्यावर ते पुन्हा मागे येतील म्हणून पाटील पुन्हा सूरतच्या दिशेने असलेल्या ट्राफिकमध्ये शिरले. ट्रकच्या रांगांमधून चालत एका बाईकवाल्याच्या मदतीने गावापर्यंत ते पोचले. ट्रक, खाजगी वाहनानां पुढे सोडण्याची विनंती त्यांनी केली. एका यूपीच्या ट्रकवाल्याने लिफ्ट दिली. पाऊस सुरू असल्याने भिजलेल्या अवस्थेत कैलास पाटील यांना ट्रकवाल्याने दहिसर टोलनाक्याजवळ सोडलं, आणि मी परतलो, असा अनुभव कैलास पाटील यांनी सांगितला होता.

FAQs

1. आमदार बालाजी कल्याणकर कोण आहेत?
ते नांदेड उत्तर मतदारसंघातील शिवसेना आमदार आहेत.

2. बंडाच्या काळात नेमकं काय घडलं होतं?
कल्याणकरांनी सांगितले की, बंडाच्या काळात तीव्र तणावाखाली ते एका हॉटेलच्या गच्चीवर गेले होते आणि उडी मारण्याचा विचार केला होता.

3. त्यांनी हे वक्तव्य कुठे केलं?
हे वक्तव्य त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानावर माध्यमांशी बोलताना केले.

4. या घटनेचा राजकीय परिणाम काय झाला?
या खुलाशानंतर ठाकरे गटातील आमदारांवर झालेल्या ताणतणावाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

5. शिंदे बंडाशी या घटनेचा काय संबंध होता?
ही घटना शिंदे बंडाच्या सुरुवातीच्या काळातली असून त्या वेळी ठाकरे गटातील काही आमदारांवर मानसिक दबाव होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT