Beed Crime News Sarkarnama
मराठवाडा

Beed Crime News : शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या टोळीचे वाल्मिक कराड कनेक्शन? संतोष देशमुख पार्ट टू करण्याची धमकी..

Shivraj Divte was allegedly assaulted by a gang suspected to have links with Valmik Karad. The threat of a "Santosh Deshmukh Part Two": पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी आरोपी विविध जाती-समाजाचे असल्याचे सांगितले. दोन आरोपी अल्पवयीन असून या घटनेला जातीय वळण न देण्याचे आवाहन केले आहे.

Jagdish Pansare

Marathwada News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे केलेल्या हत्येचे प्रकरण अजून निकाली निघाले नाही, तोच बीड जिल्ह्यात जीवे मारण्याचे प्रयत्न, हल्ले, दरोडे, टोळी युद्धाचे प्रकार सुरूच आहेत. परळी तालुक्यात शिवराज दिवटे या तरुणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्याने जबर मारहाण करत त्याच्या अपहरणाचा प्रयत्न केला. दिवटे याला झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले. शिवाय दिवटे याने आरोपी हे 'तुला सोडणार नाही, याचा संतोष देशमुख पार्ट टू करू' असे धमकावत असल्याचा दावा केला आहे.

या पार्श्वभूमीवर दिवटे याला मारहाण करणाऱ्या टोळक्याचे वाल्मिक कराड (Walmik Karad) गँगशी काही कनेक्शन आहे का? याची चर्चा जिल्हाभरात सुरू झाली आहे. बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी दहा पैकी सात आरोपींना अटक केली असून विविध जाती-समाजाचे ते असल्याचे सांगितले आहे. दोन आरोपी अल्पवयीन असून या घटनेला जातीय वळण न देण्याचे आवाहन केले आहे. किरकोळ भांडणातून झालेला हा प्रकार आहे. विषय गंभीर असल्याने आरोपींवर कठोर कलमं लावण्यात आल्याचे काँवत यांनी व्हिडिओ जारी करत सांगितले. पण पोलीसांकडून ही गँग वाल्मिक कराडशी संबंधित आहे का? याबाबत अधिकृत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी शिवराज दिवटे याला झालेल्या मारहाणीची माहिती देताना सांगितले की, काल 16 मे रोजी साडेअकरा वाजता परळी तालुक्यातील जलालपुर येथे हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रम असल्याने फिर्यादी शिवराज नारायण दिवटे, वय 18 वर्षे, रा. लिंबोटा, ता. परळी, जि. बीड (Beed Crime) हे जयदिप मुंडे नावाच्या मित्रासह सदर कार्यक्रमास गेले होते. तेथे फिर्यादी व त्यांचा मित्र जेवण करीत असतांना काही मुलांचे तेथे भांडण झाले. त्यानंतर दुपारी तीन-साडे तीनच्या सुमारास फिर्यादी हे त्यांचे मित्र जयदिप मुंडे यांच्यासह मोटार सायकलवरुन जयदिप चौरे नावाच्या मित्रास सोडण्यासाठी शिवाजीनगर येथे गेले.

तिथून फिर्यादी हे मित्र जयदिप मुंडे याच्यासह मोटारसायकलने लिंबोटी गावाकडे जाण्यासाठी निघाले. त्यानंतर फिर्यादी हे मित्रासह रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आले असता तेथे तीन ते चार मोटारसायकलस्वार यांनी येऊन फिर्यादीची मोटारसायकल अडवून त्यास मारहाण केली. त्यानंतर शिवराज दिवटे याला बळजबरीने मोटारसायकलवर बसविले व रत्नेश्वराच्या डोंगरातील झाडीमध्ये घेऊन गेले. हा देखील त्या भांडणात होता, याला जीवेच मारुन टाका, असे म्हणून वीस जणांनी शिवराज नारायण दिवटे यांस लोखंडी रॉड, कत्ती बेल्ट, काचेची बॉटल व काठीने मारहाण करून जखमी केले.

त्यावेळी दिवटे याने आरडाओरड करत मदतीसाठी याचना केली तेव्हा आजूबाजूला असलेल्यांपैकी कोणीतरी मदतीला धावले. परंतु तोपर्यंत मारहाणीत बेशुद्ध पडलेल्या दिवटे याला सोडून आरोपींनी पळ काढला होता. विशेष म्हणजे मारहाणीचा व्हिडिओ रेकाॅर्ड करून नंतर तो सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या शिवराज दिवटे यांना परळीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व महाविद्यालयात हलवण्यात आले. सध्या दिवटे याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सदर प्रकरणी शिवराज नारायण दिवटे यांच्या फिर्याद वरुन परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुरनं. 105/2025, कलम 109, 126(2), 140(3), 118(1), 189(2), 189(4), 190, 191(3) BNS अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून एकुण 20 आरोपीपीपैकी सचिन विष्णू मुंडे, वय 24 वर्षे, रा. नंदागौळ, ता. परळी, रुषीकेश ज्ञानोबा गीरी, वय 18 वर्षे, रा. टोकवाडी,ता. परळी, रोहण उमेश वाघुळकर, वय 18 वर्षे, रा. विद्यानगर, परळी वै., समाधान श्रीकृष्ण मुंडे,वय 20 वर्षे, रा. टोकवाडी, ता. परळी, अदित्य बाबासाहेब गिते, वय 18 वर्षे, रा. नंदागौळ, ता. परळी जि. बीड यांच्यासह इतर 2 अल्पवयीन मुलांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा विविध पथकांच्या माध्यमातून शोध सुरू आहे.

गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे करत आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे विविध जाती-धर्मातील असून यामध्ये कोणताही जाती जातीतील संघर्ष नाही. धार्मिक कार्यक्रमात झालेल्या भांडणातून हा हल्ला करण्यात आला असून सर्व आरोपी हे तरुण आहेत. त्यामुळे कोणीही या प्रकरणाला जातीय रंग देऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT