Nagesh Patil Ashtikar-Narhari Zirwal Sarkarnama
मराठवाडा

NCP Minister : अजितदादांच्या मंत्र्याबाबत शिवसेना खासदार आक्रमक; ‘तुम्ही आमचा जिल्हा वाऱ्यावर सोडणार आहात का?’

Hingoli Guardian Minister Issue : महायुती सरकारमध्ये अनेक मंत्र्यांना नको असलेल्या जिल्ह्याची पाटीलकी (पालकमंत्रिपद) मिळाली आहे. अनेकांना स्वजिल्ह्यापासून दूरवरील जिल्ह्याची सुभेदारी मिळाल्याने ते संबंधित जिल्ह्याकडे फिरकत नाहीत.

Vijaykumar Dudhale

Hingoli, 07 September : महायुती सरकारमध्ये अनेक मंत्र्यांना नको असलेल्या जिल्ह्याची पाटीलकी (पालकमंत्रिपद) मिळाली आहे. अनेक मंत्र्यांना स्वजिल्ह्यापासून दूरवरील जिल्ह्याची सुभेदारी मिळाल्याने ते संबंधित जिल्ह्याकडे फिरकत नसल्याचे दिसून येत आहे. लांबचा प्रवास टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिमचे पालकमंत्रिपद सोडले होते. आता हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवळ यांना हटवा, अशी मागणी हिंगोलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हिंगोलीचे पालकमंत्रिपद अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. नाशिक ते हिंगोलीचे अंतर पाहता झिरवळ यांनी पहिल्याच भेटीत पालकमंत्रिपदाबाबत नाराजी व्यक्त केली होती. आमच्या वाट्याला गरीब जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आले, असे विधान पहिल्याच दौऱ्यात नरहरी झिरवळ यांनी केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अनेक मंत्र्यांना आपल्या जिल्ह्यापासून लांबच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे, त्यामुळे ते नाराज आहेत. त्यामुळे अनेक मंत्री हे संबंधित जिल्ह्याकडे फिरकत नसल्याची तक्रार होती. संबंधित जिल्ह्यातही या पालकमंत्र्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त होत होती. आता तर संबंधित पालकमंत्र्यांना बदला, अशी मागणी होऊ लागली आहे.

हिंगोलीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे, त्यामुळे शेतातील सोयाबीन, कपाशी ही पिके हातची गेली आहेत. सोयाबीनच्या शेंगा गळून गेलेल्या आहेत. शेतकरी अतिशय मेटकुटीला आलेला आहे. आम्ही पंचनाम्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र, प्रशासकीय आदेश आणि पालकमंत्र्यांनी इंट्रेस्ट घेतल्याशिवाय हे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना काही मिळणार नाही, असे खासदार आष्टीकर यांनी नमूद केले आहे.

ज्यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याचे पालकत्व आहे, त्यांनीच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असेल तर शेतकऱ्यांनी कोणाकडे बघायचे. त्यांनी काय करायचे, असा सवालही खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला. पालकमंत्री झिरवळ यांनी हिंगोली जिल्ह्यात यायला पाहिजे, फिरायला पाहिजे. पण दुर्दैव आहे की, ते अजूनही फिरत नाहीत, असेही खासदारांनी नमूद केले.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना हिंगोलीचे पालकमंत्री बदला, अशी मागणीचे पत्र दिलेले आहे. पालकमंत्री त्यांना दिलेल्या जिल्ह्याची व्यवस्था करत नसतील, त्या जिल्ह्याकडे पाहत नसतील, त्यांचे पालकत्व स्वीकारत नसतील तर अशा वेळी पालकमंत्री हे बदलेलच पाहिजेत. ते हिंगोलीचे पालकत्व स्वीकरत नसतील तर हा जिल्हा वाऱ्यावर सोडणार आहात, असा सवाल आम्ही पत्रातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT