Somnath Suryavanshi 
मराठवाडा

Somnath Suryavanshi: सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणी कायद्यातला मोठा दोष आला समोर; प्रकाश आंबेडकरांची कोर्टाकडं केली 'ही' महत्वाची मागणी

Somnath Suryavanshi: सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सोमनाथचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याची माहिती दिली होती. पण नंतर पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं होतं.

Amit Ujagare

Somnath Suryavanshi Death Case: सोमनाथ सुर्यवंशी कस्टोडियल डेथ प्रकरणी आज मुंबई हायकोर्टातच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली. यावेळी पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी पोलीस खात्याकडून कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं. पण अशा प्रकारच्या कस्टोडियल डेथ अर्थात पोलिसांच्या ताब्यात असताना झालेल्या मृत्यू प्रकरणांमध्ये कायद्यातच मोठा दोष असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं याबाबत या खटल्याचे मुख्य वकील अॅड. बाळासाहेब ऊर्फ प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टाकडं महत्वाची मागणी केली आहे.

कोर्टात नेमकं काय घडलं?

हायकोर्टात झालेल्या सुनावणीत आज पोलीस खात्यानं तसंच गृहविभागाच्या मुख्य सचिवांनी आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं. यामध्ये शपथेवर त्यांनी सोमनाथ पोलिसांच्या ताब्यात असताना नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. याचा संपूर्ण तपशील समोर आलेला नाही. पण यावर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तीवाद केला. त्यांनी कोर्टापुढं सांगितलं की, भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम १९६ नुसार, पोलीस कोठडीत संशयित आरोपीचा मत्यू झाल्यानंतर त्याची जर न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर पुढे काय कार्यवाही करायची? याबाबत कायद्यातच कुठलीही स्पष्ट तरतूद नाही. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनं यांनी कायद्यातला हा दोष किंवा दुरुस्ती अद्यापही केलेली नाही.

त्यामुळं आमची कोर्टाला विनंती आहे की, कोर्टानं ज्यांना बोलावलं आहे, त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यांना फक्त धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं कोर्टानं हा प्रश्न निकाली काढण्यासाठी सोमनाथ सुर्यवंशीला न्याय देण्यासाठी स्वतः कोर्टानं कायद्यातील त्रृटी भरुन काढावी किंवा गृह खात्याच्या मंत्र्यांना कोर्टानं बोलवावं आणि हा अपूर्ण कायदा पूर्ण करणार की नाही? याबाबत विचारणा करावी.

दरम्यान, याप्रकरणात आता उद्या पुन्हा औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत कोर्ट कदाचित प्रकाश आंबेडकर यांच्या मागणीनुसार, सरकारला कस्टोडिअल डेथ संदर्भात कायद्यात स्पष्ट तरतूदी करण्याचे आदेश देऊ शकते. त्यामुळं यापूर्वी किंवा भविष्यात ज्या कस्टोडियल डेथ नोंदवल्या जातील त्या न्यायापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला होऊ शकतो.

सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरण काय?

परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधनाच्या प्रतिकृतीची १० डिसेंबर २०२४ रोजी विटंबना झाली होती. याविरोधात शहरात मोठं आंदोलन झालं होतं, नंतर या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं. मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि जाळपोळ झाली. यावेळी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवलं होतं. दरम्यान, केवळ आंदोलनात सहभागी झालेला एक कायद्याचा विद्यार्थी सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी (वय ३५) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर १५ डिसेंबर २०२४ रोजी त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरिरावर अनेक जखमा असल्याचं आणि त्यामुळं मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. म्हणजेच पोलीस कोठडीत झालेल्या बेदम मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचे संकेत मिळत होते.

या प्रकरणावरुन मोठा गदारोळ माजल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अधिवेशनादरम्यान सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याची माहिती दिली होती. पण नंतर ही पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचं समोर आल्यानं पोलिसांनीच सोमनाथचा खून केला असा आरोप त्याच्या आईनं केला होता. त्यानुसार मुंबई हायकोर्टानं या प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे तसेच सखोल चौकशीचे आदेश दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT