Tuljapur Sugar Factory  Sarkarnama
मराठवाडा

Tuljapur Sugar Industry : लोकमंगल, दृष्टी शुगर अपयशी; ‘गोकुळ’ने पेटविले ‘तुळजाभवानी’चे धुराडे

Vijaykumar Dudhale

चंद्रकांत गुड्ड

Andur News : तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदायिनी ठरलेला आणि सुवर्णकाळ पाहिलेला तुळजाभवानी सहकारी कारखाना अर्थिक अडचणीत येऊन बंद पडला. त्यामुळे तो खासगी कंपन्यांना चालवण्यासाठी देण्यात आला. खासगी कंपन्यांनीही शेतकरीहिताला फाटा दिल्याने कारखाना बंद पडला. आता पुन्हा नव्या विकसकाला कारखाना चालवायला दिल्याने तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारखान्याचे बाॅयलर प्रदीपन नुकतेच झाले आहे. (Sugarcane farmers in Tuljapur hope on Gokul sugar factory)

तुळजापूर तालुक्यातील बालाघाटच्या कुसळी डोंगरावर १९८४ मध्ये माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, माजी आमदार (कै.) सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, माजी आमदार (कै.) शिवाजीराव पाटील बाभळगावकर यांच्या प्रयत्नाने नळदुर्ग शिवारात प्रतिदिन १२०० टन गाळप क्षमतेचा तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आला. स्थापनेपासून सलग ११ वर्षे नरेंद्र बोरगावकर हे अध्यक्ष होते. त्यानंतर (कै.) सिद्रामप्पा आलुरे गुरुजी व सिद्रामप्पा खराडे यांनीही अध्यक्षपद सांभाळले. स्थापनेपासून २००० पर्यंत कारखाना सुरळीतपणे सुरू होता. त्यावेळी कारखान्यावरील कर्ज व साखरसाठा बरोबरीत होता. कारखाना अत्यंत कुशलपणे चालविल्याने १९९७ मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा प्रथम पुरस्कार मिळाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर २००१-२००२ च्या गळीत हंगामात अवघे ५६ हजार टन इतक्या अत्यल्प उसाचे गाळप झाले. परिणामी कारखाना प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला. त्यामुळे कर्जाची परतफेड करणे मुश्कील झाले. २००२ मध्ये कर्ज प्रकरण पुनर्गठीत करून सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, यश आले नाही. दरम्यान, २००३ ते २००६ कारखाना बंद राहिला. त्यामुळे २००६ मध्ये तत्कालीन अध्यक्ष कै. सिद्रामप्पा आलुरे गुरुजींनी कर्ज पुनर्गठीत करून २००६-२००७ चा गळीत हंगाम सुरू केला. त्यावेळी केवळ सव्वा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाल्याने कारखान्याची आर्थिक स्थिती अधिक बिकट होत गेली.

अनेक प्रयत्नांनंतरही कारखान्याची स्थिती सुधारत नसल्याने संचालक मंडळाने २००७ मध्ये आमदार सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल उद्योग समूहाला भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी दिला. परंतु अवघ्या दोन वर्षांतच करार मोडीत काढून ‘लोकमंगल’ने अंग काढून घेतले. लवादाने लोकमंगल समूहास सहा कोटी ९७ लाख रुपये कारखान्यास देण्याचे आदेश दिले. त्याविरोधात लोकमंगलने धाराशिव जिल्हा न्यायालयात दाद मागितल्याने सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

नव्या उमेदीने २०१० मध्ये मूळचे नळदुर्गचे मुंबईतील बांधकाम व्यावसायिक अशोक जगदाळे यांच्या दृष्टी शुगर इंडस्ट्रीज मुंबई यांना सहा वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी दिला. दोन वर्षे चालवून करार रद्द करून दृष्टीनेही लवादाकडून करार रद्द करून घेतला. दरम्यान, कारखान्याने लवादाकडे कारखाना, कर्मचारी व सरकारचे २२ कोटी रुपये येणे असल्याबाबत जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला. सरकारला द्यावयाची ३८ हजार क्विंटल लेव्ही साखर परस्पर बाजारात विकल्याने कारखान्याने त्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी नळदुर्ग पोलिसांना अशोक जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. सध्या ते प्रकरण जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे.

मधल्या २०१२ ते २०२१ पर्यंतच्या काळात कारखाना बंद होता. कारखाना प्रशासनाने निवडणूक निधी न भरल्याने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेण्यात आला. बिकट अर्थिक स्थितीमुळे २०१८ मध्ये कारखाना अवसायानात काढून अवसायक नेमला. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी अवसायक एस. पी. रोडगे व प्रभारी कार्यकारी संचालक विकास भोसले यांनी ई टेंडरद्वारे भाड्याने देऊन चालवायला देण्यासाठी प्रवृत्त केले.

त्यानुसार त्यांनी सोलापूर येथील गोकुळ उद्योग समूहाला आसवानी प्रकल्पासह १५ वर्षांकरिता भाडेतत्त्वावर दिला आहे. गोकुळने गतवर्षी जवळपास १५ कोटी रुपये खर्चून मोडकळीस आलेला आजारी कारखाना सुस्थितीत आणला आहे. परिणामी १२५० टन होणारे गाळप आता प्रतिदिन २००० टन क्षमतेने होणार आहे. सन २०२१-२२ मध्ये यशस्वी चाचणी गळीत हंगाम घेऊन ६७ हजार टन उसाचे गाळप केले आहे. यंदा जवळपास अडीच लाख टन उसाचे गाळप अपेक्षित आहे, त्यादृष्टीने तयारी करण्यात आली आहे.

सध्या जिल्हा बँकेचे ४३ कोटी मुद्दल कर्ज व त्यावरील व्याज ८० कोटी मिळून १२३ कोटी कर्ज आहे. गोकुळ शुगरकडून भाड्यापोटी मिळणारी रक्कम, कर्मचाऱ्यांचा पगार व जिल्हा बँकेत हप्त्यापोटी सुमारे एक कोटी ५४ लाख यावर्षी भरणा करण्यात आला आहे. यंदा कमी पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या कुरनूर मध्यम प्रकल्पात अवघे २५ टक्के पाणी असून, ते ही पिण्यासाठी आरक्षित केले असल्याने पुढील वर्षी लाभक्षेत्रात नाममात्र ऊस येण्याची शक्यता असून, त्याचा ऊस गळीत हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

कारखाना नव्याने उभारी घेईल आणि विस्कळीत झालेली कारखान्याची घडी पूर्ववत होईल, या आशेने आमदार सुभाष देशमुख यांचा लोकमंगल उद्योग समूह व अशोक जगदाळे यांच्या दृष्टी उद्योग समूहाला देण्यात आला होता, परंतु ती आशा फोल ठरली. कारखाना पुन्हा अडचणींच्या खाईत अडकला. गोकुळ शुगरने तुळजाभवानी सहकारी कारखाना युनिट-२च्या चेअरमनपदी सुनील चव्हाण यांची नियुक्ती केल्याने सध्या ते काम करीत आहेत. मागील काळात घडून गेलेल्या कटू आठवणी बाजूला ठेवून कारखाना, कामगार, ऊस उत्पादकांच्या हितासाठी काम करून कारखाना कर्जमुक्त करण्याचे शिवधनुष्य या सर्व घडामोडींचे साक्षीदार असलेल्या सुनील चव्हाण यांना पेलवते की नाही, हे आगामी काळात स्पष्ट होईलच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT