Mumbai News : धाराशिव-बीड-लातूर विधानपरिषद मतदारसंघाचा इतिहास पहिला तर 2018 साली झालेल्या निवडणुकीत मोठा उलटफेर पाहवयास मिळाला होता. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवार निवडून येण्याइतपत संख्याबळ असताना भाजपच्या सुरेश धस यांनी विजय मिळवत आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा 72 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे यावेळेसच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असले तरी या मतदारसंघातील निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहवयास मिळत आहे. धाराशिव जिल्हयात माजी मंत्री व आमदार तानाजी सावंत यांचे वर्चस्व आहे. त्यांच्याकडे धाराशिव जिल्ह्यात जवळपास 35 मते आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सावंतांची भूमिका निर्णायकी ठरणार आहे. या निवडणुकीत ऐनवेळी त्यांची मते कोणाच्या पारड्यात टाकून कोणाचा गेम करणार याची चर्चा रंगली आहे.
भूम-परंडा मतदारसंघाचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) तानाजी सावंत आमदार आहेत. याठिकाणी त्यांच्या आघाडीकडून परंडा व भूम पालिकेत स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्याशिवाय दोन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यही आहेत. त्यामुळे जवळपास 35 सदस्य संख्या असल्याने या मतावर बरेच काही अवलंबुन आहे. तानाजी सावंत हे महायुतीकडून आमदार झाले आहेत. मात्र, महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारात कुठेच दित नाहीत. त्यामुळे त्यांची भूमिका गेमचेंजर ठरणार आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीवेळी त्यांची भूमिका भाजपविरोधात होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीवेळी महायुती होणार की नाही याबाबत उत्सुकता लागली होती. दुसरीकडे जिल्ह्यातील भाजप (BJP) नेते व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी फारसे जुळत नाही. त्यामुळेच आताही सावंत भाजप उमेदवाराच्या पारड्यात स्वतःची मते टाकणार का? याची उत्सुकता लागली आहे. मतदानास चार दिवसाचा कालावधी राहिला आहे. मात्र, आतापर्यंत निवडणुकीपासून ते अलिप्त दिसत आहेत. काँग्रेस उमदेवार महेश देशमुख अथवा भाजप उमेदवार बसवराज पाटील यांच्याकडून संपर्क साधण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे त्यांनी उघडपणे कोणाचीही बाजू घेतलेली नाही.
तानाजी सावंत यांची शांतता सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप व काँग्रेस उमेदवाराने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठी भेटीवर भर दिला आहे. मात्र, दुसरीकडे मात्र तानाजी सावंत मतदारसंघात सक्रिय दिसत नसल्याने महायुतीसमोरील अडचणी वाढल्या आहेत. जिल्ह्यातील राजकारणात तानाजी सावंत यांचे संख्याबळ महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधान परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे तानाजी सावंत काय निर्णय घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यांच्या निर्णयाचा परिणाम या निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो. चुरशीच्या होत असलेल्या या निवडणुकीत सावंत कोणाच्या पारड्यात वजन टाकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सावंत नेमका कोणाला मतदान देऊन कोणाचा गेम करणार? याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.