Chhatrapati Sambhajinagar, 27 December : छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यांतील पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना वाचताही येत नाही, अशी माहिती पुढे आली आहे. त्यावरून आमदार प्रशांत बंब यांनी पुन्हा एकदा शिक्षकांवर निशाणा साधला आहे. राज्यातील शिक्षक हे साठ हजारपासून दीड लाखापर्यंत गलेलठ्ठ पगार घेतात, पण आपले कर्तव्य चोखपणे बजावत नाहीत. दर्जेदार शिक्षणासाठी वेळप्रसंगी संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करायला सरकारला भाग पाडेन, असा इशाराही आमदार बंब यांनी दिला आहे.
आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी यापूर्वी शिक्षक नेमणुकीच्या ठिकाणी न राहता भत्ता उचलतात, असा आरोप केला होता. त्यावरून राज्यभरातील शिक्षकांनी आमदार बंब यांच्या विरोधात रान उठवले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा बंब यांनी ‘शिक्षक गलेलठ्ठ पगार घेतात, पण कर्तव्य बजावत नाहीत,’ असे विधान एका वाहिनीशी बोलताना केले आहे. त्याचे पडसाद शिक्षकांमध्ये उमटण्याची शक्यता आहे.
आमदार बंब म्हणाले, मी गेली सात ते आठ वर्षांपासून शिक्षणाच्या अनुषंगाने शिक्षकांबाबत (Teacher) मते मांडत आहे. मी त्यावेळी सांगितलं होतं की, पुढच्या पाच ते सात वर्षांत अशी परिस्थिती निर्माण होईल आणि तसंच घडलंय. ही मला स्वतःला अत्यंत दुःख देणारी गोष्ट आहे. आपल्या राज्यकर्त्यांसाठी ही लज्जास्पद गोष्ट आहे. एकदा तो काळ निघून गेला की म्हणजे पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थ्यांचा जो पाया बनत असतो, तो पायाच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देत असतो.
आपल्या राज्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा बोजवारा उडलेला आहे. त्याची कारणं मी सांगितली होती. आपल्या देशाने आणि राज्याने लष्कारानंतर सर्वांत मोठी जबाबदारी म्हणून गलेलठ्ठ पगार देऊन शिक्षकांना नियुक्त करण्यात येत आहे.
मी यापूर्वीही शिक्षकांना अनेकदा विनंती केली आहे. आजही करतो की, त्यांनी सगळं सोडून आपापल्या गावी जाऊन मुक्कामी राहावं. कारण, फक्त दहा ते पाच हे त्यांचे शिकवण्याचे काम नाही. त्यांनी नियुक्तीच्या गावांत राहून संस्कार देण्याचे काम, गावात व्यसनमुक्तीचे काम ही सगळी कामं शिक्षकांची असतात. मात्र, राज्यातील शिक्षक आपली कर्तव्ये बजावत नाहीत. उलट खोटी कागदपत्रं करून सरकारकडून पैशाची लूट करतात, असा आरोपही पुन्हा एकदा बंब यांनी केला.
आमदार प्रशांत बंब म्हणाले, राज्यातील शिक्षकांना मी हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतो की, विद्यार्थ्यांना शिकवणे आणि इतर कामांना तुम्ही गांभीर्याने घेतली पाहिजे. शिक्षकांची स्वतःची मूलं खासगी शाळेत शिक्षकांना पंधरा हजार रुपयेही पगार नाही, अशा शाळांमध्ये शिकवत असतात. सरकारकडून मात्र, साठ हजार ते दीड लाखांपर्यंत पगार घेतात. म्हणजे यात सगळं आलं. मी या गोष्टीवर सातत्याने पाठपुरावा केला आहे.
मी आता मोहिम हातात घेणार आहे की, कोणत्याही परिस्थिती दर्जेदार शिक्षण व्हायला पाहिजे, हे माझे मत आहे आणि त्यासाठी घटनेच्या चौकटीत राहून मी संपूर्ण प्रयत्न करणार आहे. वेळप्रसंगी संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करायला मी सरकारला भाग पाडेन, असा इशाराही आमदार बंब यांनी दिला आहे.
नवनियुक्त शिक्षणमंत्री दादा भूसे हे दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक ती पाऊले उचलतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. मी लवकरच भुसे यांची भेट घेऊन या सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घालणार आहे, असेही बंब यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.