Sanjay Bansode, AJit Pawar, Eknath Shinde sarkarnama
मराठवाडा

Parbhani Administration News : प्रशासनातील अधिकाऱ्यांना परभणीची ओढ; घोटाळे बहाद्दरांना पुन्हा नियुक्ती

Prasad Shivaji Joshi

Parbhani News : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी असे म्हटले होते की, जनतेच्या कामाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी होय म्हटले पाहिजे आणि नेत्यांनी नाही असे म्हटले पाहिजे. परभणी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी मात्र इतर ठिकाणी बदलीसाठी नाही म्हणत आहेत आणि केवळ परभणी साठी होय म्हणत असल्याचे दिसून येत आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत बदली हा अनिवार्य घटक समजला जातो. धडाकेबाज कार्यशैलीमुळे कायम चर्चेत असलेले तुकाराम मुंडे यांची तर सातत्याने बदली झालेली आहे. मात्र काही अधिकारी याला अपवाद असतात. वर्षानुवर्षे सोयीच्या ठिकाणी कार्यरत राहण्याचे त्यांच्या कौशल्याबद्दल जनतेमध्ये कायम चर्चा होत असते.

स्वाती सूर्यवंशी या २०२० मध्ये परभणीत उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या. मात्र त्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहाथ सापडल्याने त्यांना अटकही करण्यात आली होती. तसेच विभागाकडून त्यांच्या मालमत्तेची चौकशी चालू आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई सुध्दा करण्यात आलेली आहे. सेवेत पुन्हा रुजू झाल्यानंतर त्या वर्धा येथे कार्यरत होत्या.

राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या. त्यात स्वाती सूर्यवंशी (Swati Suryawanshi) या पुनश्चः एकदा परभणी जिल्ह्यात रुजू झाल्या आहेत. मात्र वर्धा येथे भूसंपादन अधिकारी पदावर कार्यरत असताना तब्बल अडीच कोटींच्या अपहार प्रकरणी वर्धा येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध कारणासाठी जिल्ह्यातील शिक्षण विभाग नेहमीच चर्चेत असतो.

शिक्षणाधिकारी विठल भुसारे आणि आशा गरुड यांना नियमबाह्य पद्धतीने काम केल्यामुळे शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र आशा गरुड या पुन्हा एकदा सेवेत रुजू झाल्या आहेत आणि त्यांना परभणी येथेच नियुक्ती मिळाली आहे. सध्या गंगाखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी असलेले जयवंत सोनवणे यांनी परभणी जिल्ह्यातील मानवत, सोनपेठ, सेलू व जिंतूर येथे काम केले आहे.

जालना जिल्ह्यातील मंठा येथे त्यांची बदली झाली होती, मात्र त्यांना परभणी महापालिकेमध्ये उपायुक्त पदी नियुक्ती देण्यात आली होती. मानवत नगर परिषदेमध्ये स्थापत्य अभियंतापदी कार्यरत असलेले सय्यद अनवर अशफाक रहेमान यांची वाशीम जिल्ह्यातील मालेगाव जहांगीर येथे बदली करण्यात आली होती. १९ मे २०२३ रोजी त्यांच्या बदलीचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. परंतु अद्यापही ते मानवत येथेच कार्यरत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रशासनात कार्यरत असताना स्थानिक राजकीय नेत्यांशी जुळवून घेण्याची कार्यपद्धती असल्याने नेत्यांचीही सर्व कामे सुरळीत होतात. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळ्यात अडकले, शासनाने निलंबनाची कार्यवाही, गुन्हा दाखल होणे किंवा जिल्ह्याबाहेर झालेली बदली असो यापैकी काहीही झाले तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी बदली मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT