Beed News: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारने छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक घेत मराठवाड्यासाठी तब्बल ४९ हजार कोटींच्या घोषणा केल्या. मात्र, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे परत मागवले असल्याचा राज्य सरकारचा अजब कारभार समोर आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी एन्ट्री केली. आर्थिक नियोजनात अजित पवार माहिर मानले जातात. पण याच 'त्रिमूर्ती सरकार'ने शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ४९ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांच्या घोषणा केल्या; पण दुसरीकडे शाळांतील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी पाठविलेला निधी परत मागवल्याने आता सरकारवर टीका होत आहे.
'शासन आपल्या दारी' उपक्रमाच्या नावाखाली कोट्यवधींची उधळण सरकार करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत, तर दुसरीकडे विद्यार्थी उघडे राहिले तरी बेहतर असे या 'त्रिमूर्ती सरकार'चे धोरण असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दोन गणवेशांसाठी सरकारकडून सहाशे रुपयांचा निधी दिला जातो. एकीकडे कपड्यांची शिलाई हजारांच्या घरात असताना दुसरीकडे या विद्यार्थ्यांना तीनशे रुपयांत गणवेश घ्यायला लावून तुम्ही गरीबच असल्याची जाणीव सरकार करून देते की काय, अशी परिस्थिती आहे.
या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निधी हा दोन टप्प्यांत देण्यात येतो. 'समग्र शिक्षा अभियान'ला मिळालेला निधी संबंधित गटशिक्षणाधिकारी व नंतर हा निधी शालेय शिक्षण समित्यांना वर्ग करण्यात येतो. त्यामुळे या प्रक्रियेत पुन्हा महिनाभराचा वेळ जातो.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे गणवेश ही केवळ औपचारिकता ठरते. त्यातही आता गणवेशासाठी पाठविलेल्या निधीत अखर्चित रक्कम शासनाने परत मागितली आहे. त्यामुळे शिक्षणप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
एकट्या बीड जिल्ह्यातून ६२ लाख ९७ हजार रुपयांचा गणवेश निधी परत पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील गणवेशासाठी शासनाकडून तीन कोटी ४४ लाख ९७ हजार ९०० रुपयांचा निधी मिळाला.
दरम्यान, 'समग्र शिक्षा अभियान'च्या राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाकडून २३ आॅगस्टला सद्यःस्थितीत शिल्लक निधी राज्य कार्यालयास वर्ग करण्याच्या सूचना दिल्याने दुसऱ्या टप्प्यातील मोफत गणवेशाचा निधी प्रकल्प संचालक कार्यालयास वर्ग करण्यात आला. एकीकडे सरकार हजारो कोटींच्या घोषणा करत असताना दुसरीकडे विद्यार्थी उघडे राहिले तरी या सरकारला चालतात का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Edited by - Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.