Jalgaon News : ‘तुम्हाला आमच्याबरोबर गुवाहाटीला यावं लागतंय,’ असं एकनाथ शिंदेंनी आम्हाला फोन करून सांगितलं. मी म्हटलं ‘उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही दोन वर्षे होतो. मी स्वतः राज्यमंत्री होतो. पण, त्यांनी काही दिव्यांग मंत्रालय केलं नाही. तुम्ही करता का सांगा, तरच मी येतो. नाहीतर गाडीतून खाली उतरतो,’ त्यावर शिंदेंनी मला ‘बच्चू, आपण केल्याशिवाय राहणार नाही,’ असा शब्द दिला होता आणि विक्रमी वेळेत दिव्यांग मंत्रालय अस्तित्वात आले, अशी आठवण आमदार बच्चू कडू यांनी सांगितली. (Bacchu Kadu had threatened Eknath Shinde)
जळगावमधील एका कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते. त्यावेळी त्यांना गुवाहाटीची आठवण सांगितली. ते म्हणाले की, आम्ही गुवाहाटीला गेलो आणि खोक्यावरून प्रचंड बदनाम झालो. एवढं बदनाम केलं राव, की बाहेर कुठं जावं की नाही जावं, असं वाटायचं. कुठंही गेलं तरी खोके घेऊन गेला, खोके घेऊन आला, असे टोमणे मारले जायचे. पण मला त्या बदनामीची फिकीर नाही. ‘हम अगर गुवाहाटी नही जाते, तो दिव्यांग मंत्रालय नही होता.’ त्या गुवाहाटीच्या बदनामीची ऐशी की तैशी. त्याची आम्हाला पर्वा नाही.
आम्ही जेव्हा दुसऱ्या वेळी गुवाहाटीला गेलो, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही जेवायला बसलो. त्यावेळी मी त्यांना म्हणाले की, आपलं दिव्यांग मंत्रालय राहिलं आणि आपल्याला ते केलं पाहिजे. मी जेव्हा १५ वर्षांपूर्वी दिव्यांग बांधवांसाठी लढाई सुरू केली. तेव्हा आम्ही सुरुवातीला कायम दिव्यांग मंत्रालय झालंच पाहिजे, असं निवेदन द्यायचो. आम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंगला बसायचो, तेव्हा ती मागणी सोडून बाकीच्या विषयांवर चर्चा व्हायची. एकवेळ अशी आली की दिव्यांग मंत्रालय होणार नाही, असे लक्षात आलं आणि आमचा भ्रमनिरास झाला. आम्हाला ८२ शासन निर्णय करता आले, पण दिव्यांग मंत्रालय करता आलं नाही, अशी खंतही बच्चू कडू यांनी बोलून दाखवली.
आमदार कडू म्हणाले की, सुमारे दीड ते दोन कोटी लोकसंख्येला अल्पसंख्याक मंत्रालय झालं. दीड कोटीच्या लोकसंख्येला सामजिक न्याय मंत्रालय झालं. दिव्यांग बांधव तीन कोटींच्या घरात जातात, त्यांचं मंत्रालय होत नव्हतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतूनच मुख्य सचिवांना फोन करून सांगितलं की, तीन डिसेंबर जवळ आला आहे. आम्ही २९ ला येणार आहोत. दिव्यांग मंत्रालयाचा प्रस्ताव कॅबिनेटला आला पाहिजे. इतक्या जलद गतीने कोणत्या मंत्रालय तयार झालं असेल, तर त्याचं नाव दिव्यांग मंत्रालय आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे त्यात मोठे योगदान आहे, मी नाममात्र होतो.
दिव्यांग बांधवांना तीन पायाच्या सायकली देण्याऐवजी ई सायकली देण्याची मागणी आम्ही करणार आहोत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे स्वतः दोन कोटी रुपयांच्या ई सायकली वाटप करणार आहेत, असेही कडू यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.