Rana Jagjitsinh Patil,Madhukarrao Chavan Sarkarnama
मराठवाडा

Rana Jagjitsinh Patil : 'या' मतदारसंघाने दिला सलग ५५ वर्षे धोतर नेसणारा आमदार!

Sachin Waghmare

Dharashiv : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता त्या ठिकाणी धोतर घालणाराच आमदार होत होता. त्यामुळे तुळजापूरमध्ये आमदार व ‘धोतर’ असे अतूट नाते निर्माण झाले होते. गेल्या ५५ वर्षांत तुळजापुरातून धोतराचा सोगा सांभाळणाऱ्यानेच आतापर्यंत विजयश्री खेचून आणली होती. मात्र, ही परंपरा २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील यांनी खंडित केली. त्यांनी ‘धोतर’वाले आमदार मधुकरराव चव्हाण यांचा २४ हजार मतांनी पराभव करीत पहिल्यांदा बिगर ‘धोतर’वाला आमदार निवडून येऊ शकतो हे सिद्ध केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे, आई तुळजाभवानीची पूजा धोतर परिधान करूनच करण्यात येते. त्यामुळे या ठिकाणी २०१९ पर्यंत धोतर घालणाराच आमदाराचा विजय होत होता. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात २०१९ पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीचे चित्र पाहता १९६२ मध्ये काँग्रेसचे कै. साहेबराव हंगरगेकर यांनी विजय मिळविला होता. उघड माथ्याचा व कुसळी गवताचा डोंगराळ तालुका असे त्यांनी तुळजापूरचे वर्णन विधानसभेत केले होते. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यांचा पेहराव नेहमीच टोपी, शर्ट आणि धोतर असा पाहावयास मिळत होता.

त्यानंतर १९६७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिवाजीराव पाटील बाभळगावकर या मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी ग्रामीण भागातील तळागाळाच्या नागरिकांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. तेही टोपी, शर्ट आणि धोतर घालत होते. त्यानंतर १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत कै. शिवाजीराव पाटील बाभळगावकर हे पुन्हा विजयी झाले. १९७८ मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या खटारा चिन्हावर माणिकराव खपले निवडून आले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तुळजापूर शेकापमय करून सोडला. शेतकरी व कष्टकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्यांचाही पेहराव शर्ट अन् धोतर असाच होता.

१९८० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने शिक्षणमहर्षी कै. सि. ना. आलुरे गुरुजी यांना उमेदवारी दिली अन् ते विजयी झाले. त्यांनी शैक्षणिक कार्य जोमाने सुरू केले. त्यांचा पेहरावसुद्धा टोपी, शर्ट व धोतर असाच होता. त्यानंतर १९९० तसेच १९९९ व २००४ आणि त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले, तर १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे माणिकराव खपले आमदार झाले होते.

विशेष म्हणजे काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण लोकल बोर्डाचे सभापती, भूविकास बँकेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, सलग ११ वर्षे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होते, तर काही काळ त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष पद त्यांनी सांभाळले, तर आघाडी सरकारच्या काळात ते काही काळ परिवहनमंत्री, दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्रीदेखील होते. पांढरे शुभ्र धोतर आणि नेहरू सदरा असा त्यांचा पेहराव आहे.

इतिहास मोडीत काढला...

त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत तुळजापूर व धोतर यांचे हे समीकरण कायम राहते का, याची उत्सुकता सर्वांनाच लागली असताना विधानसभा निवडणुकांपूर्वी केवळ १५ दिवस आधी भाजपमध्ये प्रवेश करीत राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली. त्यांनी या निवडणुकीत सलग चार वेळा निवडून आलेल्या माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा पराभव करीत गेल्या ५५ वर्षांच्या धोतरवाल्या आमदाराचा इतिहास मोडीत काढला. राणा जगजितसिंह पाटील यांच्या रूपाने तुळजापूरला पहिल्यांदा बिगर ‘धोतर’वाला आमदार निवडून आला. या निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांनी ९९ हजार, तर मधुकरराव चव्हाण यांना ७५ हजार तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढणाऱ्या उद्योगपती अशोक जगदाळे यांना ३५ हजार मते मिळाली.

जगदाळेंच्या वातावरण निर्मितीचा राणा पाटलांना फायदा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांना शिवसेनेच्या ओम राजेनिंबाळकर याच्याकडून एक लाख २७ हजार मताने पराभव स्वीकारावा लागला होता. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर होते. मात्र, त्यांनी ऐनवेळी काळाची पावले ओळखून व स्वतःचा हक्काचा मतदारसंघ सोडून तुळजापूर मतदारसंघात भाजपमध्ये प्रवेश करीत उमेदवारी मिळवली. दुसरीकडे या मतदारसंघातून २०१८ पासून अशोक जगदाळे तयारी करीत होते.

२०१८ च्या बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात अशोक जगदाळे यांनी रान पेटवले होते. मतदारसंघातील महिलासाठी देवदर्शन सहल, फिरता दवाखाना, टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा, जनावरासाठी चारा वाटप करून मतदारसंघात मोठे चव्हाण विरोधात वातावरण केले होते. त्यामध्ये अचानक एन्ट्री करीत राणा पाटील यांनी भाजपची उमेदवारी मिळवत या मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यांनी या निवडणुकीत चव्हाण विरोधात जगदाळे यांनी केलेल्या वातावरण निर्मितीचा फायदा घेत विजयश्री खेचून आणला.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT