Sarkarnama
मराठवाडा

Tuljapur: मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी : तुळजापूरचे तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित

Tuljapur Engineering College, Government Engineering College, Dharashiv Education: तुळजापूर अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित होणार असून ११८ पदांच्या भरतीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे धाराशिव जिल्ह्यात आधुनिक तांत्रिक शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

Jagdish Pansare

Tuljapur News: महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या नावाने तुळजापूरमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ११८अध्यापक आणि शिक्षकेत्तर पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील ही मोठी घटना असून तुळजापूर तालुका आता अत्याधुनिक अभियांत्रिकी शिक्षणाचे हब बनणार असल्याचा विश्वास तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही महानगरांतील विद्यार्थ्यांप्रमाणे अत्याधुनिक अभियांत्रिकी शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा, नवतंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण सुविधा सुरू करण्यात येणार आहेत.

या क्षेत्रातील भविष्यातील संधी पाहता त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी आम्ही दृढनिश्चयी असून या दिशेने सातत्याने प्रयत्नशील आहोत. धाराशिव जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने अनेक वर्षांपासून त्याची मागणी होती. त्याअनुषंगाने आई तुळजाभवानी मातेच्या नावाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करावे यासाठी आपला आग्रह होता, असेही ते म्हणाले.

त्या अनुषंगाने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, उदय सामंत व विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह तत्कालीन तसेच विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांचे राणा पाटील यांनी आभार मानले.

राज्य शासनाच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने महाविद्यालयासाठी ३०० प्रवेशक्षमतेनुसार ६० नियमित अध्यापक पदे आणि ५८ शिक्षकेतर पदांसह एकूण ११८ पदांना मान्यता दिली आहे. भविष्यात रिक्त पदे शासकीय नियमानुसार भरली जाणार आहेत. तसेच महाविद्यालयाचे नाव बदलून 'श्री तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर' असे करण्यात येणार असल्याचे राणा पाटील यांनी सांगीतले.

सध्या महाविद्यालयात कार्यरत असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना नवीन पदभरतीमध्ये सहभागी होता येणार असून जे होणार नाहीत त्यांना संस्थानच्या माध्यमातून वेतन देण्यात येणार आहे. 'विकसित महाराष्ट्र २०४७'च्या दृष्टीकोनातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सायबर सेक्युरिटी, ग्रीन टेक्नॉलॉजी, रिन्यूएबल एनर्जी आणि ईव्ही टेक्नॉलॉजी यांसारखे आधुनिक, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक असून, जिल्ह्याला उच्च शिक्षणाच्या नव्या युगात घेऊन जाण्याचा हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल असा विश्वासही राणा पाटील यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT