Nanded DCC Bank : नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी आठवडाभरापासून चर्चेत असलेली खासदार अशोक चव्हाण समर्थक संचालकांची नावे अचानक मागे पडली. बी. आर. कदम, मारोतराव कवळे यांच्यासारखे अनुभवी संचालक शेतकरी विकास पॅनलमध्ये असताना मुखेडचे आमदार तुषार राठोड यांचे नाव थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सुचवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
फडणवीसांचा एक फोन आला आणि डाॅ. तुषार राठोड जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. भाजपचे तीन टर्म आमदार असलेले राठोड हे मुख्यमंत्र्यांच्या गुडबूकमध्ये आहेत. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यातील निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर होता.
राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यानंतर अशोक चव्हाणांनी 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोकरमधून कन्या श्रीजया चव्हाण, बिलोलीमधून जितेश अंतापूरकर यांच्यासाठी मतदारसंघ सुरक्षित करून घेतले होते. त्यामुळे भाजपकडून वर्षानुवर्षे विधानसभा लढू इच्छिणाऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले.
पुढे संघटनात्मक बांधणीतही चव्हाण समर्थकांनाच महत्त्वाची पदे दिले गेली. महानगरप्रमुख पदावर चव्हाण यांनी अमर राजूरकर यांची नेमणूक करून घेतली. पुढे नांदेड स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी देत विधान परिषदेवर पाठवले. नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांनीच उमेदवार ठरवण्यापासून सगळी यंत्रणा स्वत:कडे ठेवली.
काँग्रेसमध्ये असताना जी कार्यपद्धती अशोक चव्हाणांची होती, तीच पुढे पार्टी विथ डिफरन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपातही कायम राहिली. यातून पक्षातील निष्ठावंत विरुद्ध अशोक चव्हाण यांच्यासोबत टप्प्याटप्याने भाजपमध्ये दाखल होणार्या समर्थकांमध्ये सुप्त संघर्ष जाणवू लागला. अनेकदा निष्ठावंतांना डावलले जात असल्याच्या तक्रारी मुंबई, दिल्लीपर्यंत गेल्या. पण राज्याच्या आणि केंद्रातील नेतृत्वाने सबुरीने घेतले. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भाजपच्या ताब्यात घेण्यासाठी सगळी जबाबदारी पुन्हा अशोक चव्हाण यांच्याकडेच देण्यात आली. बँकेचे संचालक मंडळ बिनविरोध करण्याचा त्यांचा निम्मा प्रयत्न यशस्वीही ठरला.
निवडणूक झालेल्या 12 पैकी 11 संचालकही महायुतीच्या पॅनलचेच निवडून आले. अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी जेव्हा हालचाली सुरू झाल्या तेव्हाही अशोक चव्हाण समर्थकांचीच नावे यात आघाडीवर होती. पु्न्हा आपल्या डावलले जाणार, असे चित्र दिसू लागताच सूत्रं फिरली.
विदेशातील अभ्यास दौऱ्यावर असलेल्या डाॅ. तुषार राठोड यांचे नाव अचानक अध्यक्ष पदाच्या चर्चेत आले. केवळ चर्चा नाही तर आज त्यावर शिक्कामोर्तबही झाले. शेतकर्यांची जिल्हा बँक आणि त्याचा कारभारी भाजपाचाच तोही ओरिजनल असावा, अशा स्थानिक पदाधिकारी, नेत्यांचा आग्रह होता. तो फडणवीसांनी मान्य केला. अशोक चव्हाणांनी त्यांनी एक फोन केला आणि अध्यक्षपद राठोड यांच्या गळ्यात पडले.
तुषार राठोड डॉक्टर ते राजकारणी
डॉ. तुषार गोविंदराव राठोड यांचा यांचे एमबीबीएसचे शिक्षण मुंबईतील सेंट जी. एस. मेडिकल कॉलेजमधून झाले आहे. त्यानंतर डिप्लोमा इन मेडिकल रेडिओलॉजी अँड इलेक्ट्रॉलॉजी (DMRE) मध्ये त्यांनी केला. 2004 मध्ये एमबीबीएस आणि त्यानंतर रेडिओलॉजीशी संबंधित शिक्षण त्यांनी पूर्ण केले. राजकारणात येण्यापूर्वी ते वैद्यकीय व्यवसायात होते.
2015 च्या पोटनिवडणुकीच्या वेळी ते राजकारणात नवखे होते. वडील गोविंदराव राठोड यांच्या निधनानंतर त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. वडील गोविंदराव राठोड हे भाजपकडून मुखेड विधानसभा मतदारसंघातून 2014 मध्ये निवडून आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसांतच त्यांचे निधन झाले. त्यामुळे मुखेड मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली.
भाजपने दिवंगत आमदारांच्या जागी त्यांचे पुत्र डॉ. तुषार राठोड यांना उमेदवारी दिली. या निर्णयामागे वडिलांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती आणि कुटुंबाचा मतदारसंघातील राजकीय संपर्क हे महत्त्वाचे घटक मानले गेले. विशेष म्हणजे शिवसेनेने या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे भाजपचे तुषार राठोड यांचा मार्ग सुकर झाला होता.
13 फेब्रुवारी 2015 रोजी मुखेड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे डॉ. तुषार राठोड यांनी काँग्रेसचे हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या विजयामुळे तुषार राठोड प्रथमच विधानसभेत पोहोचले.
2015 चा विजय हा प्रामुख्याने पोटनिवडणूक आणि वडिलांच्या निधनानंतरची सहानुभूती या पार्श्वभूमीवर झाला होता. त्यामुळे 2019 ची विधानसभा निवडणूक तुषार राठोड यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी अधिक महत्त्वाची होती. त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर पुन्हा मुखेडमधून निवडणूक लढवली आणि काँग्रेसचे भाऊसाहेब खुशालराव पाटील यांचा पराभव केला. नांदेड जिल्ह्यात काँग्रेस आणि इतर पक्षांचे प्राबल्य असताना मुखेड हा भाजपच्या प्रमुख बालेकिल्ल्यांपैकी एक राहिला.
राठोड यांची हॅट्रीक
2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा डॉ. तुषार राठोड यांच्यावर विश्वास दाखवला. या निवडणुकीत त्यांच्या विरोधात काँग्रेसचे हणमंतराव व्यंकटराव पाटील बेटमोगरेकर आणि अपक्ष म्हणून बालाजी खतगावकर हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा सलग तिसऱ्यांदा पराभव करत हॅट्रीक केली.
देवाभाऊंचा भक्कम पाठिंबा..
2024 मध्ये राठोड यांच्या प्रचारासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुखेडमध्ये तुषार राठोड यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत फडणवीस यांनी तुषार राठोड यांना 'तुम्ही आमदार करा, मी मंत्री करतो', असा शब्द दिला होता. पण महायुतीच्या सरकारमध्ये ते शक्य झाले नाही. मात्र फडणवीसांनी राठोड यांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद देत काही प्रमाणात भरपाई केल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.