Eknath Shinde: खासदार पुत्रासाठी एकनाथ शिंदेंची फोनाफोनी : शिवसेना आमदाराची थेट निवडणुकीतून माघार; कृष्णा पाटील आष्टीकरांचा मार्ग मोकळा

Nanded District Bank Election, Krishna Patil Ashtikar, Eknath Shinde: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर आमदार बाबुराव कदम यांनी माघार घेतली. त्यामुळे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील यांच्या संचालकपदाचा मार्ग मोकळा झाला.
Krishna Patil Ashtikar
Krishna Patil AshtikarSarkarnama
Published on
Updated on

Nanded District Bank Election: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडी घडल्या. भाजपचे खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजुरकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न केले. मात्र प्रत्येकालाच संचालक व्हायचे असल्याने अनेक इच्छुकांनी माघार घेण्यास नकार दिला आणि आता बारा संचालकांसाठी निवडणूक होत आहे.

दरम्यान जिल्हा बँकेवर संचालक होण्यासाठी सक्रिय झालेल्या हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील यांना अखेर यश येताना दिसत आहे. हदगाव तालुक्यातून संचालक पदासाठी त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत थेट न्यायालयात धाव घेणारे शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी अखेर आपली बंडाची तलवार म्यान केली आहे.

ऑपरेशन टायगर अंतर्गत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून मुलाला जिल्हा बँकेत संचालक करण्यासाठी खासदार आष्टीकर यांनी आपले राजकीय वजन वापरत बाबुराव कदम यांना माघार घेण्यास भाग पाडले आहे.

Krishna Patil Ashtikar
Nanded DCC Bank: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट; 'आमदारकी'ला पडलेल्या खासदार पुत्र कृष्णा पाटील आष्टीकरांची उमेदवारी अडचणीत

कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या उमेदवारीला बाबुराव कदम यांनी आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधी अचानक बाबुराव कदम यांनी हदगाव मधील आपली उमेदवारी मागे घेतली. या निर्णयामागे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या करवी बाबुराव कदम यांना केलेला फोन हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हदगाव विधानसभा मतदारसंघात आष्टीकर विरुद्ध बाबुराव कदम असा राजकीय संघर्ष कायम राहिला आहे. या राजकीय विरोधातूनच हदगाव तालुक्यातील कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या उमेदवारीला कदम यांनी विरोध दर्शवला होता. अर्जासोबत दाखल केलेल्या अनेक कागदपत्रांवर आक्षेप घेत बाबुराव कदम यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुलासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शब्द टाकला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट आमदार बाबुराव कदम यांना फोन करून कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे सांगितले.

त्यानंतर कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत कृष्णा पाटील आष्टीकर यांचा नांदेड जिल्हा बँकेत संचालक होण्याचा मार्ग सुकर केला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यामुळे आपण हदगाव तालुक्यातील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे बाबुराव कदम यांनी माध्यमांना सांगितले. शिवसेना हा शिस्तीचा पक्ष आहे एकदा नेत्यांनी आदेश दिला की तो आम्हाला पाळावाच लागतो. त्यानुसार आपण माघार घेतल्याचे बाबुराव कदम यांनी काहीशा नाराजीच्या सुरात सांगितले.

Krishna Patil Ashtikar
District Bank : सहकारातील घराणेशाही जोरात, परभणी जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी आमदार तान्हाजी मुटकुळे यांची सुनेसाठी माघार!

आमदारकीची तहान संचालक पदावर भागली?

कृष्णा पाटील आष्टीकर यांनी नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवली होती. ऑपरेशन टायगरच्या जोरदार हालचाली राज्यात सुरू असतानाच नांदेड विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही मुलाला आमदार करण्यासाठी जोर लावला होता. काँग्रेसच्या रामदास सुमठाणकर यांना ऐनवेळी माघार घ्यायला लावून कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यासाठी खासदार महोदयांनी जोरदार फिल्डिंगही लावली होती.

नांदेडची जागा आम्हीच जिंकणार, आमच्याकडे संख्याबळ आहे असा दावा आष्टीकर पिता- पुत्र जाहीरपणे करत होते. मात्र ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीतील संपूर्ण चित्र बदलले. तरी देखील कृष्णा पाटील आष्टीकर हे मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातच असून महाविकास आघाडीचाच उमेदवार असल्याचे ठामपणे सांगत होते.

मात्र त्यांच्या या दाव्याचा फारसा उपयोग झाला नाही आणि नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजप महायुतीचे अमरनाथ राजूरकर हे प्रचंड मताधिक्यानी निवडून गेले. त्यामुळे कृष्णा पाटील आष्टीकर यांचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले. आता त्यांना नांदेड जिल्हा बँकेवर संचालक करत त्यांच्या आमदारकीची तहान संचालक पदावर भागवली अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com