

BJP-NCP Politics : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आता वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुती प्रणित शेतकरी विकास पॅनलने 23 पैकी 21 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणत खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढवली. संचालक पदासाठी सर्वांना वाटा दिल्यानंतर आता अध्यक्षपद आपल्या पक्षाकडे म्हणजे भाजपकडे राहावे, असा त्यांचा प्रयत्न आहे.
तर महायुती म्हणून सर्वजण एकत्र लढल्यामुळे अध्यक्ष पदावर आपल्याला पहिले संधी मिळावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार माधवराव जवळगावकर हे बाळगून आहेत. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा बँक आणि नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अशोक चव्हाण-प्रताप पाटील चिखलीकर एकत्र आले असले तरी ती तात्पुरती तडजोड होती, असे बोलले जाते.
हे दोन्ही नेते कधीच एकत्र येऊ शकत नाही, दोघांच्या राजकीय महत्वाकांक्षा मोठ्या आहेत. अशोक चव्हाण यांना जिल्ह्याच्या नेतृत्वात दुसरा वाटेकरी नको आहे. त्यामुळे विधान परिषद, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोबत असलेले चव्हाण-चिखलीकर भविष्यातही एकत्र राहतील याची खात्री कोणालाच देता येत नाही.
शिवाय जिल्हा बँकेचा अध्यक्ष हा भाजपाचाच असावा, अशी आग्रही मागणी स्थानिक नेत्यांकडून होत आहे. हे धोरण पाहता अध्यक्षपदाच्या निवडणूकीपुर्वीच आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा सुरू आहे. अध्यक्षपदासाठी उत्सूक असलेले दुसरे संचालक म्हणजे माजी आमदार माधवराव जवळगावकर. त्यांचा भाजप प्रवेश होता होता राहिला.
स्थानिक काही नेते मंडळींचा जवळगावकर यांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध आहे. अशोक चव्हाण यांनी त्यांना भाजपात आणण्याची पूर्ण तयारी केली होती. पण विरोध होताच ते ही 'वेट अॅन्ड वाॅच' च्या भूमिकेत गेले आहेत. त्यामुळे अध्यक्ष पदाच्या रेसमधून माधवराव जवळगावकर यांना ही साईट ट्रॅक करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे तुर्तास चिखलीकर, जवळगावकर अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाद झाल्याचे चित्र आहे.
अध्यक्ष नाही, तर उपाध्यक्ष तरी..
पुढील अडीच वर्षासाठीच्या अध्यक्षपदाचा शब्द तरी त्यांना अशोक चव्हाण यांच्याकडून दिला जातो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवाय चिखलीकर हे किमान उपाध्यक्ष पद आपल्या कन्या प्रणिता देवरे चिखलीकर यांना मिळावे, या प्रयत्नात आहेत. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात पहिल्यांदाच पाच महिला सदस्य निवडून आल्या आहेत.
यामध्ये बँकेचे माजी अध्यक्ष भास्कर पाटील खतगावकर यांच्या सुनबाई मीनल पाटील खतगावकर, आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पुनम पवार, काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण यांच्या मामी सुशीला बेटमोगरेकर यांचा समावेश आहे. त्यामुळे उपाध्यक्ष पदासाठीही शेतकरी विकास पॅनलच्या संचालकांमध्ये मोठी स्पर्धा असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.