अविनाश काळे
Umarga Constituency News : शासकीय नोकरीचा राजानीमा देत राजकारणाच्या आखाड्यात उतरलेले आणि मैदान मारून आमदार झालेले प्रवीण स्वामी पुन्हा एकदा परीक्षेला बसले आहेत. उरमगा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळवत प्रवीण स्वामी यांनी ज्ञानराज चौगुले यांचा पराभव करत सगळ्यांनाच धक्का दिला होता. जायंट किलर ठरलेले प्रवीण स्वामी आता आणखी एका परीक्षेला सामोरे जात आहेत.
शिक्षक ते आमदार असा राजकीय प्रवास एका महिन्यातच पूर्ण केल्यानंतर आमदार प्रवीण स्वामी आता बीएडची परीक्षा देत आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते धाराशीव (Dharashiv) येथील परीक्षा केंद्रावर पेपर सोडवताना दिसले. आमदार स्वामी हे कोरेगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक होते. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र शिक्षणक्षेत्रा प्रतीचा त्यांचा ओढा कमी झालेला नाही. म्हणूनच त्यांनी बीएडची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता.
उमरगा विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीत जनमतांच्या गुणांकाने उत्तीर्ण झालेले आमदार प्रविण स्वामी धाराशिव येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या अध्यापन शास्त्र पदवी परीक्षेसाठी बसले आहेत. उमरगा, लोहारा तालुक्याच्या राजकारणात ऐनवेळी 'एन्ट्री' घेऊन महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून (Shivsena) विधानसभा निवडणूकीत विजयाचा गुलाल त्यांच्या कपाळी लागला.
आमदार स्वामी यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत 26 वर्ष शिक्षक म्हणून काम पाहिले. तालुक्यातील कोरेगाव येथील जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक म्हणुन ते कार्यरत होते. विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात ते उत्कृष्ठ सूत्रसंचलन करत असतं. मितभाषी स्वभाव असल्याने ते सर्वत्र परिचित आहेत. मात्र ऐनवेळी राजकारणात येऊन जनमतांच्या बळावर लोकप्रतिनिधी होणारे ते पहिले आमदार ठरले आहेत.
अनेक परीक्षांचा अनुभव
बारावी नंतर डी.एड. पदविका पूर्ण करून जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणुन नोकरीला लागलेले आमदार स्वामी सेवांतर्गत शिक्षण घेत बी.ए. इंग्लिश, एम. ए. इंग्लिश, डी. सी. एम, बी.एस्सी पदवी घेतले आहेत. 2023- 2025 या वर्षासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दोन वर्षाचा अध्यापन शास्त्र अभ्यासक्रमासाठी त्यांनी फॉर्म भरला होता. दरम्यान 2024 च्या अखेरीस विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना शिक्षकी पेशा सोडत राजीनामा दिला. निवडणूकीत ते विजयी झाले. आमदार झालो तरी अध्यापन शास्त्र पदवी परीक्षा द्यायची. असा निश्चय करून ते परीक्षा देत आहेत.
या परीक्षेत ते उत्तीर्ण होतील, याशिवाय मतदारसंघातील विविध कामांची प्रश्नावली त्यांच्यासमोर आहे, त्यालाही त्यांना सामोरे जावे लागेल. मुलांसमोर अध्यापन करताना मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. शिक्षण क्षेत्रातुन राजकिय क्षेत्रात येण्याची संधी मतदारांच्या सहकार्यातून मिळाली. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने आयुष्यात कायम शिकत राहवे, त्यातून नवनवीन माहिती संधी मिळते, असे आमदार प्रवीण स्वामी म्हणतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.